जळगाव : शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर राज्यात साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले आहे. त्यात शिवसेनेतील जवळपास 40 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत आहे. दरम्यान याच काळात काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात तर जळगावमधील दोन पाटलांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तक्रार आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे. चिमनराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत गुलाबराव पाटील हे माझ्या विरोधातील राष्ट्रवादीच्या व्यक्तीला निधी देतात, त्यांच्या कार्यक्रमाला जातात, त्यांनी त्यांना निधी द्यायला नको, कार्यक्रमाला जायला नको असं मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे, याबाबत स्वतः माध्यमांशी बोलत असतांना चिमनराव पाटील यांनी तक्रारीचे कारण सांगितले आहे.
चिमनराव पाटील यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांनी निधी दिला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील वेळ देतात तो द्यायला नको अशी मागणी स्वतः चिमणराव पाटील यांनी केली आहे.
तिकडे आमदार बच्चू कडू देखील मंत्री पद मिळाले नाही म्हणून नाराज असल्याची चर्चा होती, त्यातच राणा आणि कडू यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.
राणा आणि कडू यांच्यातील वाद हा गुवाहाटी पर्यन्त गेला असून पन्नास खोके घेतल्याचा आरोप होत असून त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दरबारी पोहचला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांमधील नाराजी हळूहळू बाहेर येऊ लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.