नाशिकः नाशिकमध्ये दिवसाढवळ्या मुलींचे छेड काढली जाते. अपहरणाचा प्रयत्न होतो. राज्यात 25 हजार महिला, मुली गायब झाल्यात. महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये बोलताना केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
बालमृत्यूची जबाबदारी कोणाची?
चित्रा वाघ म्हणाल्या, आदित्य ठाकरेंना शेंद्रीपाड्यात पूल बांधण्याची विनंती केली. शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज आहे. जिल्ह्यातील 50 टक्के आदिवासी बांधवांना खावटी योजनेचं अनुदान मिळालेलं नाही. नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात 31 मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी केला.
दिवसाढवळ्या अपहरण
वाघ पुढे म्हणाल्या की, राज्यात अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजघडीला राज्यातून 25 हजार महिला आणि मुली गायब झाल्यात. हे पाहता प्रश्न पडतो की, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि आता मुख्यमंत्रीही गायब आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय, असा तिखट प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नाशिकमध्ये काय झाले?
नाशिकमध्ये सोमवारी मार्केड यार्ड परिसरातील पोलीस ठाण्याजवळ मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही तरुणी काकासोबत पायी जात होते. यावेळीआलेल्या दोन तरुणांनी सुरुवातीला तरुणीची छेड काढली. मात्र, तरुणीने विरोध केला. तेव्हा त्यांनी या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मुलीच्या काकाने या अपहरणकर्त्या तरुणांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात तरुणीने जोरदार आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतले. मात्र, चक्क पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण पोलीस ठाणे परिसर सुरक्षित नसेल, तर नेमका कुठला भाग सुरक्षित मानायचा असा सवाल विचारला जात आहे. चित्रा वाघ यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे.
खून, चोरी, लूटमारही सुरूच
नाशिकमध्ये गुन्हेगार अक्षरशः मोकाट सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी एका भाजप पदाधिकाऱ्यास एकाच आठवड्यात तिघांचे खून झाले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात खुनामागून खून झाले आणि दरोड्यामागून दरोडेही पडले. चोरी, लूटमार या घटनांही सुरूच आहेत. मग पोलीस करतायत काय, असा सवाल विचारला जात आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?