बदलत्या वातावरणामुळे, हवामानामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याचा फटका ठाणे शहरातील नागरिकांनाही बसल्याचे दिसून येत आहे. बदलते हवामान, खराब हवा, धूळ, प्रदूषण यामुळे ठाणेकर वैतागले असून अनेकांना आरोग्याच्या समस्या सतावत आहेत. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांमध्ये तब्बल 2034 ठाणेकरांना खोकला, ताप, घसादुखीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. कधी पावसामुळे तर कधी थंडी, तसेच कधी कडक उन्हामुळे आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे होणाऱ्या परिणामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डॉक्टरांच्या मते, प्रदूषण, धूळ, आणि स्वतः उपचार करण्याच्या सवयींमुळे हा त्रास अधिक बळावत आहे.
रिपोर्ट्सनुसार, ठाण्यात वातावरणातील सतत बदलांमुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होताना दिसत आहेत. जुलै ते डिसेंबर या कालावधीत 2034 नागरिकांना ताप, खोकला आणि घसादुखीने बेजार केले आहे. त्यापैकी 1250 रुग्णांना हा त्रास दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिला होता, तर 688 जणांना केवळ खोकल्याचा दीर्घकाळ त्रास झाला.
अंगावर आजार काढल्याने आजार दीर्घकाळ टिकतो
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात रुग्णांच्य संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक ठाणेकर तक्रारी अंगावर काढून स्वतःच औषध घेत असल्याने आजार दीर्घकाळ टिकल्याचे समोर आलं.
अधिक क्षमतेची औषधे घेतल्याने डॉक्टरांनी दिलेली औषधे प्रभावी राहत नाहीत. तसेच, रस्त्यांचे काम, इमारतींच्या बांधकामामुळे होणारी धूळ, प्रदूषण, आणि वाहतुकीतून उद्भवणारे प्रदूषण यामुळेही खोकल्याचा त्रास वाढत आहे. दिवाळीनंतरही हवामानातील तीव्र बदलांचा आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून आला. बाईक किंवा दुचाकी वापरणाऱ्या तसेच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरावा,असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतल्यास आजार टाळता येईल. थंडी-उन्हाच्या वातावरणात स्वतःचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे, अन्यथा हा त्रास दीर्घकालीन स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे, असेही डॉ्कटर म्हणाले.
नागपूरची थंडी सोसवेना, आमदार आणि मंत्र्यांना सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग
एकीकडे ठाणेकर हे आजारांनी त्रासलेले असतानाच नागपूरच्या थंडीत आमदार आणि मंत्र्यांनाही सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. नागपूरमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तिथेच हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंत्री, आमदार हे नागपूरमध्ये उपस्थित आहेत. मात्र त्यांच्यापैकी अनेकांना ही थंडी सोसवली नसल्याचे दिसत आहे. अनेक आमदार, मंत्री यांना सर्दी, खोकला तसेच घशाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.
काल विधानभवन येथील आरोग्य केंद्रात मंत्री गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच गेल्या दोन दिवसांत आरोग्य केंद्रात काही आमदारांवरही उपचार झाले. विधानभवन आरोग्य केंद्रात दोन दिवसांत 328 रुग्णांवर उपचार झाले असून चार रुग्णांना मेडीकलमध्ये पाठवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचीही प्रकृती बरी नसल्याचे वृत्त समोर आले होते.