CM Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज महाराष्ट्र विधानसभेत विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी एकमताने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातील पहिले भाषणही केले. यावेळी त्यांनी सर्व आमदारांची माफी मागितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी नवीन नियुक्त झालेल्या आणि जुन्या आमदारांना एक महत्त्वपूर्ण सूचना केली. ही सूचना करतेवेळी त्यांनी एक शब्दप्रयोग केला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली.
“योग्य वर्तन आणि शिस्त हा सभागृहाचा आत्मा आहे. मी आता तुमच्याकडे एक मागणी करु इच्छितो, या विधीमंडळात काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे. गेल्या काही वर्षात आपण या विधीमंडळातील लॉबीमध्ये चालायलाही जागा नसते, अशी अवस्था असते. उभं राहायलाही जागा नसते. इतक्या वर्ष ही अवस्था नव्हती. विधीमंडळात आमदारांनी समर्थकांना आणावं हे आपण करतो. पण अलीकडच्या काळात एक-एक आमदार २५-२५ लोक घेऊन येत आहेत. तिथेच उच्च अधिकारीही येतात. मग अशा स्थितीत चांगले काम होणार कसे?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितीत केला.
“या विधीमंडळात काम, चर्चा, अभ्यासू व्हायला हवं. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की त्यांनी चांगले उत्तर द्यायला हवं, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायलाही जागा नसते, अशी अवस्था असते. आमदारांना याचं जर वाईट वाटलं तरीही कुठेतरी वर्षानुवर्ष या विधीमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे, तिथे नीट काम व्हायला पाहिजे. विधीमंडळात बाजारासारखे वातावरण असू नये, असा शब्द मी वापरतोय यासाठी मला माफ करा. पण मला दुसरा शब्द आठवत नाही. याची आपण काळजी घ्या, अशी मला अपेक्षा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.