पुण्याजवळील चाकण या ठिकाणी आज महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रात एक मोठी घडामोड घडली आहे. छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील जन्म गाव नायगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायगावच्या वेशीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भल्या मोठ्या पुष्पहाराने नायगाव ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात देवेंद्र फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, मकरंद पाटील हे नेते उपस्थित होते.
यावेळी राज्य मंत्रीमंडळ विस्तारामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यात देवेंद्र फडणवीस हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर त्यांच्या मागच्या सीटवर हे छगन भुजबळ हे बसले होते. हे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकमेकांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्या दोघांनी पुन्हा एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात काहीतरी मोठं घडतंय असं बोललं जात आहे.
दरम्यान पुण्यात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर असणार आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छगन भुजबळांच्या नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि भुजबळ हे आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.