विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच दिवसांनी महायुतीतील मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यानंतरही खातेवाटप होण्यासाही काही दिवस लागले. अखेर आता खातेवाटप पार पडलं असलं तरी पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पालकमंत्रीपदावरून एक महत्वाचं विधान केलं आहे. आपल्याला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हवं हे फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते या विषयावर स्पष्टच बोलले.
‘ पालकमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला बीडला पाठवलं तर मी जाईल. खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिकी कराडचे नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतले जात आहे. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरीही अद्याप तीन आरोपींना अटक झाली नसून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला चहूबाजूने घेरत धारेवर धरलं आहे.
गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र बीडमधील सरपंचांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यभरात आक्रोश असून धनंजय मुंडे यांना पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये , ते (पालकमंत्रीपद) मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावं अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यासंदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं फडणवीस यांनी कालच म्हटलं होतं. तर आज त्यांना पुन्हा याबद्दल सवाल विचारण्यात आला असता फडणवीसांनी यावर पुन्हा भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री पदाचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे घेतील. मला बीडला पाठवलं तर मी जाईन. खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी इच्छा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं. आता याबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरातील वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्या विषयालाही हात घातला. ‘ बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. कोणतीही घटना घडल्यावर विरोधी पक्ष आणि सत्तेतील मंत्र्यांनी जावं. माझी हरकत नाही. पण तिथे जाऊन राजकारण करू नये. पर्यटन करू नये. कुणीही बीड आणि परभणीचं पर्यटन करू नये’ असं फडणवीस म्हणाले.