खेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी आतापर्यंत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला जशास तसं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी विचारांशी तडजोड केली. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी त्यांना हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडला. आम्ही किमान गाजर हलवा दिला तुम्ही ते पण दिल नाहीत, अशा विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. या भाषणादरम्यान शिंदे यांनी कोकणातील जनतेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मंडणगडमध्ये एमआयडीसी सुरु करणार असल्याची मोठी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच कोकणासाठी एमएमआरडीएप्रमाणे नवं प्राधिकरण करणार असल्याचीही घोषणा शिंदे यांनी केली. उबाठा गटाकडून 5 मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून ठाकरे गटाकडून राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका आणि आरोप करण्यात आले होते. या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ते बोलत होते.
“या कोकणाने शिवसेनेवर, बाळासाहेबांवर भरभरुन प्रेम केलंय. आज एकनाथ शिंदे आणि आमच्या सर्व लोकांवर तुम्ही प्रेम दाखवून दिलंय. बाळासाहेबांनी जसं तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला प्रेम दिलं, तशीच जबाबदारी ही एकनाथ शिंदेची ही आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाणार नाही. कोकणाकडे विशेष लक्ष दिलं जाईल. एमएमआरडीएच्या धर्तीवर आम्ही एक मोठं प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
“आपला राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई-गोवा तो बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. मी स्वत: सूचना दिल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली. ज्या ज्या ठिकाणी रखडलेली कामं आहेत त्याठिकाणी 1 लाईन सुरु होणार आणि संपूर्ण मार्ग डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला आहे”, असं म्हणत शिंदे यांनी कोकणवासियांना मोठा दिलासा दिला.
मुंबई-कोकण महामार्गाचं गेल्या अनेक वर्षांपासून काम कासवगतीनं सुरु आहे. शिमगा, गणेशोत्सव आणि दिवाळी याासारख्या सणांना गावी जाणाऱ्या चाकरमन्यांना या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता लवकरच महामार्ग सुरु होणार असल्याने काही प्रमाणात जनतेला दिलासा मिळाला आहे.