राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर जो गोळीबार झाला, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हा हल्ला झाला त्यासंदर्भात आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच निर्देश पोलिसांन दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणीही हातात घेता कामा नये, गँगवॉर होता कामा नये. कोणीही डोकं वर काढता नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेय असे निर्देश आम्ही पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही केस फास्टट्रॅकवर घेऊ, असेही त्यांनी नमूद केलं.
दोन आरोपींना अटक
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. एक आरोपी हरियाणाचा तर दुसरा उत्तर प्रदेशातील आहे. मात्र या हल्लेखोरांपैकी तिसरा आरोपी फरार असून पोलिसांचे पथक त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे, त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले दु:ख
दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहिली तसेच याची त्वरित चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ‘ राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. बाबा सिद्दिकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला बळ हीच प्रार्थना. राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे ‘ असे वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त हादरवणारे
भाजप नेते अशोक चव्हाण यांनीही सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दु:ख व्यक्त केले. ‘ माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळाअत एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना’ असे अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले.
राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार गटातील नेते प्रफुल पटेल यांनीही या हत्येबाबत दु:ख व्यक्त केले. या भेकड आणि निर्घृण कृत्याचा निषेध. हाँ हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणारा नाही, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी बाबा सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहिली.
Deeply shocked and saddened to learn about the demise of senior NCP leader Baba Siddique Ji. This cowardly and heinous crime must be strongly condemned, and those responsible should not be spared. My heartfelt thoughts and prayers are with his family during this difficult time.… pic.twitter.com/OcKIcIrIrt
— Praful Patel (@praful_patel) October 12, 2024
किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या एक चिंतेची बाब आहे. सरकारने स्पेशल टीम बनवून चौकशी केली पाहिजे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे , असे किरीट सोमय्या म्हणाले.