ज्ञानेश्वर लोंढे, Tv9 प्रतिनिधी, नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात सव्वा कोटी पेक्षा जास्त महिलांना आर्थिक मदत झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही महिलांकडून या योजनेसाठी अर्ज केला जातोय. राज्यातील एकही लाभार्थी माहिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांना घरोघरी जावून महिलांची विचारपूस करण्याचं आवाहन केलं आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्भूत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांना योजनेची माहिती देण्यात आली. तसेच लाभार्थी महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मदत करण्यात आली. शिवसेनेचे नेते बाबुराव कदम यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून पराभूत झाल्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आता हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण, अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ कोट्यवधी लाडक्या बहिणींना झालेला आहे.
आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबे भेट अभियाना अंतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते यांना दिले आहे. त्याच अनुषंगाने नांदेडच्या हिमायतनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले होते. या कार्यकमाला महायुतीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेकडून 2014 ला हदगांव हिमायत नगरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. बाबुराव कदम कोहळीकर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती. त्यांनी बंडखोरी करत हदगांव हिमायत नगरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबुराव कदम हे शिवसेना नांदेड जिल्ह्याचे 5 वर्ष जिल्हाप्रमुख होते. बाबुराव कदम कोहळीकर सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन नंबरला लीडला होते. आता कोहळीकर यांनी पुन्हा एकदा विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. गावागावात त्यांच्या लोकसंपर्क दांडगा आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून कोहळीकर यांची प्रतिमा आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील महिलांना अधिकाधिक मिळावा म्हणून कोहळीकर रात्र न् दिवस मेहनत करत आहेत.