औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी काल रविवारी (2 जुलै) दुपारपर्यंत प्रचंड खलबतं झाली. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत अजित पवारांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या देखील या बैठकीत होत्या. या बैठकीत थेट सत्तेत सामील होण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असा विचार सर्वसामान्यांच्या मनातही नसेल. पण दुपारी एक वाजेनंतर अनपेक्षित अशा घडामोडी घडू लागल्या. अजित पवार जे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत तेच आता सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी चर्चा समोर आली. तसेच ही चर्चा खरी ठरली. पण या घडामोडींनंतर आता शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सात नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असेलेले दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षात फूट पडलीय. ही घटना ताजी असताना आता सत्ताधारी पक्षांमध्येही धुसफूस उफाळण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत येताच शिवसेनेच्या शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्यांच्याविरोधात बोललो त्यांच्यासोबतच कसं बसायचं? असा सवाल या आंदारांचा आहे. आता मोठी खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील, अशी धाकधूक शिंदे गटाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या सत्तानाट्याने शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज झाले आहेत. बहुतांश आमदार हे स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काही आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सातत्याने बोललो, असं आमदारांचं म्हणणं आहे. तसेच शिवसेनेत फूट झाली तेव्हा अजित पवार निधी देत नसल्याचं कारण देत हे सगळे आमदार बाहेर पडले. आता त्याच अजित पवार यांच्यासोबत सत्तेत कसं बसायचं? असा प्रश्न या आमदारांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रीपदाची संधी डावलली जाणार आहे. त्यामुळे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. याशिवाय या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही त्यांची राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारासोबत मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.