ठाणे | जगात कुणी कोणत्याही पदावर, खुर्चीवर विराजमान झालं तरीही आई-मुलाचं नात्याचा विषय येतो, तिथे आपसुकच सगळी वल्कलं गळून पडतात. मूल लहान असल्यापासून ते मोठं होईर्यंत आई आणि मुलात घडलेल्या असंख्य गोष्टी, संवाद, भावनिक क्षण असे असतात, जे अखेरपर्यंत या दोहोंना घट्टा बांधून ठेवतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात या दोघांमध्ये कितीही अंतर पडलं तरी विशिष्ट भावनिक क्षणी या नात्याचा निखळ क्षण आपल्यासमोर येतो. राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं सर्वात मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde). एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) अचानक भावूक झाल्या. ठाण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांनी हा प्रसंग अनुभवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आई लता शिंदे या अंबरनाथमध्ये भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. याला निमित्त ठरलं ते शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये शंकर महादेवन यांनी गायलेलं एक गाणं… शंकर महादेवन यांची नुकतीच एक काँसर्ट अंबरनाथमध्ये पार पडली. या कॉन्सर्टमध्ये तारे जमीन पर चित्रपटातील ‘माँ’ हे गाणं गायलं. या गाण्याला सुरुवात होताच लता शिंदे भावुक झाल्या. हे पाहून खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः आईजवळ जाऊन बसलेय यावेळी हे दोघेही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तर खासदारांच्या पत्नी वृषाली शिंदे यादेखील याक्षणी भावनिक झाल्या.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी भावूक झाल्याचा क्षण काँसर्टमधील उपस्थितांनी अनुभवला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सदैव कामात व्यग्र असल्यामुळे आई आणि माझी नियमित भेट होत नाही. कधी तरी असे काही क्षणच आम्हाला सोबत घालवायला मिळतात. आम्ही तारे जमीन पर चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा तर आई पूर्णवेळ रडत होती, असा किस्सा त्यांनी गायक शंकर महादेवन यांना सांगितला.
शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमात रसिकांची प्रचंड गर्दी झाली होती. स्वर्गीय स्वरांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करणाऱ्या शंकर महादेवन यांनी रविवारी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये र लाईव्ह कॉन्सर्ट सादर केली. या कार्यक्रमात मराठी आणि हिंदीतली त्याने गायलेली लोकप्रिय गाणी अंबरनाथकरांसमोर सादर केली. या गाण्यांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध तर झालेच. काही गाण्यांवर मनसोक्त नाचत त्यांनी याचा आनंद घेतला. अंबरनाथ ही शिवाची नगरी असून इथं येऊन खूप आनंद झाल्याचं शंकर महादेवननं सांगितलं. तर शंकर महादेवन यांचा कार्यक्रम आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हे सगळं कल्पना शक्तीच्याही पलीकडचं असून माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.