मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (Cm Uddhav Thackeray Appeal To Donate Blood)
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या 2 हजार 583 युनिट आणि मुंबईतील 58 रक्तपेढ्यांमध्ये 3 हजार 239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते.
राज्यात रक्ताची टंचाई असून येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
(Cm Uddhav Thackeray Appeal To Donate Blood)
संबंधित बातम्या
राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन