नाशिक : राज्यामध्ये डिझेल (Diesel) आणि पेट्रोल (Petrol) दर वाढलेले असल्याने अनेक नागरिकांनी सीएनजी (CNG) वाहनं खरेदी करण्यावर आणि वापरण्यावर भर दिला जात आहे. त्यातच आता सीएनची दर देखील वाढले असून डिझेलच्या दरापेक्षा जास्तीचे पैसे नाशिककरांना मोजावे लागणार आहे. नाशिकमध्ये (Nashik) मध्यरात्री पासून 4 रुपयांनी सीएनजीचे दर वाढले असून सीएनजी आता 96 रुपये 50 पैसे किलोदराने घ्यावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात खरंतर 70 च्या घरात सीएनजीचे दर होते. अवघ्या महिनाभरात म्हणजे मे महिन्यात दहा रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर जून महिन्यातही चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 4 रुपयांनी वाढ झाल्याने 96 रुपये 50 पैसे प्रती किलोला मोजावे लागणार आहे. डिझेलच्या तुलनेत संध्या सीएनजी महाग झाल्याचे सध्या चित्र आहे. किरकोळ किमतीत
सीजीडी म्हणजे सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या एमएनजीएल म्हणजेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून नाशिकमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून तीन रुपयांनी वाढ झाली आहे.
सीएनजीच्या किमतीत ही वाढ तीन रुपयांची असली तरी करांसह एकूण चार रुपयांची ही वाढ असून आता 96 रुपये 50 पैसे एका किलोला मोजावे लागणार आहे.
नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्याने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत ही वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी क्षेत्रांमध्ये लागू असलेल्या घरगुती नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भासत असल्याने ही वाढ केल्याचं बोललं जात आहे.
नाशिकमध्ये सध्या पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.65 रुपये असून डिझेलचा भाव प्रति लिटर 93.15 रुपये आहे. एकूणच काही दिवसांपासून वाढ न झाल्याने काही अंशी नागरिकांना दिलासा मिळत आहे.