विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, स्वातंत्र्यवीरांच्या पणतूपासून ते बावनकुळेंपर्यंत निषेधाचा सूर

| Updated on: Dec 09, 2024 | 6:39 PM

कर्नाटकमधील सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून कर्नाटकच्या विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्यात येणार आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, स्वातंत्र्यवीरांच्या पणतूपासून ते बावनकुळेंपर्यंत निषेधाचा सूर
Follow us on

कर्नाटकमधील सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून कर्नाटकच्या विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्यात येणार आहे. यावरून आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून सावरकरांचे पणतू रणजित सावरकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारनं बेळगावच्या सुवर्ण सौधा विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकर यांचं कर्नाटकसाठी कोणतंही योगदान नाही असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारनं विधानसभेत सावरकरांचा हा फोटो लावला होता. दरम्यान यावरून सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.रणजित सावरकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं की काँग्रेसकडून या पेक्षा काही वेगळी अपेक्षा नव्हती. मात्र या निर्णयाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.काँग्रेस फक्त टिपू सुल्तान यांचं कौतुक करते असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे,’कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही.’असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.