मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?

| Updated on: Mar 09, 2023 | 12:26 PM

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला.

मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?
CM EKNTAHH SHINDE AND AJIT PAWAR
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : विधानसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कांदा खरेदीवरून काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचा मुद्दा त्यांनी लावून धरला. सभागृहात वेलमध्ये उतरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी गदारोळ घातला. अखेर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गदारोळ घालणाऱ्या आमदारांना चांगलेच खडसावले. आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे आहे असे आश्वासन दिले.

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. तसेच, नाना पटोले यांना अधिक बोलण्याची संधी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय. काल महिला दिनी सरकार मदत करेल. शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती मात्र ती केलीच नाही अशी टीका केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चाललंय आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे. पण, शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे. निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन प्रश्न संपणार आहेत का असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे अधिवेशन सुरु असताना राज्यातील शेतकऱ्याने आत्महत्या करणे यापेक्षा दुसरी कोणतीही निकडीची बाब नाही. त्यासाठी सभागृहात मांडलेला स्थगन प्रस्ताव मंजूर करायला हवा. असे न झाल्यास राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे पाप सभागृहाच्या डोक्यावर येईल, असे सांगितले.

मात्र, अध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना चांगले खडसावले. अजित दादा तुमच्या सरकारमध्ये मी ही मंत्री होतो. त्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दतीची घोषणा केली. पण दिली का? नाही दिली. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना निधी दिला. हे सरकार सामान्यांचे सरकार आहे.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना जितका निधी दिला तेवढा निधी कोणत्या सरकारने दिला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाले हे मान्य आहे. पण, त्यासाठी मदत देताना काही प्रोसेस असते. नुकसानीचे पंचनामे करावे लागतात. किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जातो आणि मदत दिली जाते हे तुम्हाला माहित नाही का ? तरीही.. काय दादा… असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. वेलमध्ये धाव घेत गदारोळ घालण्यास सुरवात केली. मात्र, अध्यक्षांनी त्याही परिस्थितीत सभागृहाचे काम सुरु ठेवले.