महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’: नाना पटोले

| Updated on: Nov 14, 2021 | 10:03 PM

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार नवीन कृषी कायद्याच्या माध्यमातून करत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या संस्था एक एक करुन मित्रांना विकल्या.

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’: नाना पटोले
Follow us on

वर्धा : महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’ राबवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. हे सरकार आता जनतेच्या मनातून उतरले आहे. या सरकारने केलेल्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश करुन जनतेला त्याची माहिती व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाने हे जनजागरण अभियान हाती घेतले आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलंय.

काँग्रेस कमिटीच्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाला सुरुवात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाला सुरुवात झाली असून वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सेवाग्राम आश्रममार्गे करंजी (भोगे) गावापर्यंत 10 किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी नाना पटोले बोलत होते. अच्छे दिन 100 दिवसात महागाई कमी करू, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊन अशी भरमसाठ आश्वासने देऊन 2014 साली मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार केंद्रात आले, परंतु या सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. महागाई कमी तर झालीच नाही पण दुप्पच वेगाने वाढली, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडर यांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या, असं म्हणत नाना पटोलेंनी घणाघात केलाय.

मोदी सरकारचे शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करण्याचे काम

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार नवीन कृषी कायद्याच्या माध्यमातून करत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या संस्था एक एक करुन मित्रांना विकल्या. तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी 45 वर्षातील सर्वात जास्त झाली. मोदी सरकार सात वर्षात सपशेल अपयशी ठरले असून फक्त जाती धर्मात भांडणे लावून आपली सत्ता कायम कशी राहिल यावर त्यांचा भर राहिला आहे. हे सरकार आता जनतेच्या मनातून उतरले आहे. या सरकारने केलेल्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश करुन जनतेला त्याची माहिती व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाने हे जनजागरण अभियान हाती घेतले आहे, असे नाना पटोलेंनी सांगितलंय.

आजपासून (14 नोव्हेंबर) 19 नोव्हेंबरपर्यंत हे जनजागरण अभियान

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनापासून म्हणजेच आजपासून (14 नोव्हेंबर) 19 नोव्हेंबरपर्यंत हे जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. मोदी सरकारने जनविरोधी कामाची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही वाढली

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगनाला भिडलीय. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, दुकानदार यांना भांडवलदारांचे गुलाम करुन मोदी सरकारने जगणे कठीण केले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश 25 वर्षे मागे गेला असतानाही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत उलट जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. याविरोधात जनतेमध्ये जाऊन जगजागृती करण्यासाठी काँग्रेसने ‘जगजागरण अभियान’ हाती घेतली असून आठवडाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस जनतेच्या दरबारात जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार, माजी मंत्री रणजित कांबळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामसी रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

BJP Meeting | फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी बैठक, महत्त्वाच्या 3 ठरावांवर चर्चा

2014 नंतर काय मिळालं?, पेट्रोल महंगा, गॅस महंगा… छगन भुजबळांनी उडवली कंगनाच्या विधानाची खिल्ली