नांदेड | 03 ऑक्टोबर 2023 : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी आणखी सात मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. या सात रुग्णांमध्ये चार बालकांचा समावेश आहे, असं अशोक चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत. पहिल्या दिवशी 24 तर दुसऱ्या दिवशी 7 मृत्यू होतात. याला सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने या घटनेची जबाबदारी घ्यावी, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.
नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 3, 2023
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात परवा दिवशी 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे या मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. तसंच एका दिवशी एवढ्या रूग्णांचा मृत्यू होत असेल तर याहून दुर्दैवी ते काय अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमध्ये दररोज 1500 ते 1600 रुग्ण या शासकीय रूग्णालयात येतात. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण नांदेडमध्ये येतात. मृतांमध्ये 12 बालरोगी आहेत. त्यापैकी 48 तासात दाखल झालेले 6 बालकं होती. 24 तासात दाखल झालेली 6 बाळं होती. साप चावल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर आजारामुळे 7 जण दगावले आहेत. प्रसूतीमुळे 1 आणि हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र 24 तासात 24 मृत्यू झाले आहेत, हे खूप दुर्दैवी आहे, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
नांदेडमधील रुग्णांच्या मृ्त्यूवरून नागरिक संतप्त होत असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. बाहेरील रुग्णालयातून घाटीत रेफर केलेल्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 15 दिवस पुरेल एवढाच घाटी रुग्णालयात औषधांचा साठा असल्याची माहिती आहे.