‘सामान्य लोकांचा नेता’ अशी ओळख असणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं काल सकाळी निधन झालं. आत नांदेडमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव चव्हाण यांचे मित्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री डी. पी. सावंत हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, नितीन राऊत तसेच भाजपचे अशोक चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे स्थानिक नेते. काँग्रेस कार्यकर्ते आणि चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते.
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नायगावचे सरपंच ते नांदेड जिल्ह्याचे खासदार असा वसंतराव चव्हाण यांचा प्रवास राहिलेला आहे. 1978 साली नायगावचे ते सरपंच झाले. 2002 जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. लगेच राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर घेतलं. पुढे 16 वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. 2009 ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून ते निवडून आले. 2009 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला.
2024 ची यंदाची लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नांदेडची लोकसभा निवडणूक ही अटीतटीची लढाई झाली. प्रतिष्ठेची झालेली ही लढत वसंतराव चव्हाण यांनी जिंकली. तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसने मिळवलेलं हे यश महत्वपूर्ण होतं. पण खासदार झाल्यानंतर काही दिवसातच वसंतराव चव्हाण यांची प्रकृती ढासळली. काल त्यांचं निधन झालं.
नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी शोक व्यक्त केला. वसंतराव आणि माझं नातं वेगळं होतं. आम्ही चांगले मित्र होतो. ते नायगावचे सरपंच तर मी चिखलीचा सरपंच म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर विधानसभेत गेलो. तेव्हा ते विधान परिषदेत आमदार होते. मी नांदेडचा खासदार होतो आणि आता ते खासदार होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत मात्र त्यांना खासदारकीची 5 वर्षे मिळायला हवी होती, असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
लोकसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो. मात्र त्यांनी माझ्यावर आणि मी त्यांच्यावर एकदाही टीका केली नाही. परवाच मी हैद्राबादला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. एक मित्र गमावल्याचं दु:ख आहे, असं चिखलीकर म्हणाले.