महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अजून चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे ठाकरे गटाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचा निर्णय म्हणजे काँग्रेसला दफन करण्याचा हा निर्णय आहे, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा इशाराही निरुपम यांनी आपल्याच पक्षाला दिला आहे. निरुपम यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ठाकरे गटाला इशारा दिला आहे. आताच्या घडीला ठाकरे गटाला एवढेच सांगेन की, सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत, त्यावर मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे. त्यामुळे तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर करायला नको होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील, असा सूचक इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
आताच्या घडीला एवढेच सांगेन की, @ShivSenaUBT_ पक्षाला सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा, जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे, तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर नको करायला हवे होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे…
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 27, 2024
निरुपम काय म्हणाले?
निरुपम यांनीही ठाकरेंच्या यादीवर नाराजी व्यक्त केली होती. आम्ही खिचडी चोर उमेदवारांचा प्रचार करणार नाही. आम्ही शिवसेना नेत्यांचा निषेध नोंदवतो. त्यांनी अशा उमेदवारांना तिकीट द्यायला नको होतं. जागा वाटपात आमचे जे नेते होते, त्यांचाही मी निषेध करतो. आमच्या नेतृत्वाला आमची कोणतीही चिंता राही नाही. गेल्या पंधरा दिवसात नेतृत्वाने माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. काँग्रेसचं नेतृत्व देशभरात न्यायाची चर्चा करते. पण पक्षातच न्याय मिळत नाही, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे.
एक आठवड्याची वेळ देतोय
माझ्या मतदारसंघात मी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे. माझ्या मतदारसंघावर माझी पकड आहे. असं असताना मतदारसंघ ठाकरे गटाला दिला गेला. आम्ही शिवसेनेला सरेंडर झालो आहोत. काँग्रेसला श्रद्धांजली देण्याचा हा पर्याय आहे, अशी खोचक टीका करतानाच मी एक आठवड्यात निर्णय घेईल. माझ्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. माझ्या पक्षाला मी एक आठवड्याची मुदत देत आहे, असं निरुपम म्हणाले.
पाच जागांचे उमेदवार बाकी
दरम्यान, ठाकरे गटाने 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यातील मुंबईच्या चार जागांचा समावेश आहे. ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार आहे. त्यापैकी पाच जागांचे उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरूच आहे. त्याआधीच ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे.