Congress On Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील हिट अँड रनच्या घटना सातत्याने घडत आहेत. नागपुरात एक हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्या ऑडी कारमुळे ही घटना घडली, या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर नेत्याच्या मुलाला वेगळा अन् सर्व सामान्यांना वेगळा न्याय का?असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. आता यावर काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नागपूरचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी याप्रकरणी एक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंना घरचा आहेर दिला आहे. सुषमा अंधारे या तिकडे राहतात का? ही घटना माझ्या मतदारसंघात घडली आहे. त्यामुळे याबद्दल मला जास्त माहिती आहे, त्यांना काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली.
नागपुरात ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी संकेत हा फक्त गाडीत बसला होता आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेतून नेत्यांनी बोध घ्यावा, मुलांना बोध घ्यावा, असा सल्ला विकास ठाकरे यांनी दिला.
राजकीय कुटुंबातील मुलगा असला की राजकारण होते. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून सत्ताधारी पक्ष भेदभाव तर होत नाही ना, म्हणून यावर पोलिसांना विचारलं, यात गाडी जप्त करण्यात आली आहे. नेत्याचा मुलगा असो की अजून कोणीही, कारवाई झाली पाहिजे. यात जे तथ्य मिळालं, फुटेज मिळाले, यात जो दोषी असेल तो सुटायला नको आणि जर दोषी नसेल तर बदनामी सुद्धा होऊ नये. सर्वानी बोध घ्यावा. ज्या गाड्यांना लागलं यांनी तक्रारी झाली नाही. नागपूर शहर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. यात राजकारण होत आहे, असे विकास ठाकरे म्हणाले.
“माझ्या मतदारसंघात ही घटना घडली असल्यानं मी लक्ष ठेवून होतो. यात संकेत बावनकुळे हा गाडीत बसून होता, पण तो गाडी चालवत नव्हता. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. यात संकेत बावनकुळे दोषी असता तर काँग्रेस शांत बसली नसती. पोलीस योग्य रितीने तपास करत आहेत”, असेही विकास ठाकरेंनी सांगितले.
सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर
यानंतर त्यांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहेत. यात सुषमा अंधारे या तिकडे राहतात, ही घटना माझा मतदारसंघातील आहे. मला या सगळ्या प्रकरणात जास्त माहीत आहे. त्यांना माहीत नाही. संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसन सोडल नसतं, असे विकास ठाकरेंनी म्हटले.
यावेळी तिघे सोबत होते. ते जेवण करायला गेले. यानंतर मद्य प्राशन करून वाहन चालवत होता. याचा तपास व्हावा. आता येणाऱ्या दिवसात आणखी काय निष्पन्न होते त्यावर लक्ष असेल, असेही विकास ठाकरेंनी सांगितले.