यंदा सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत प्रचंड चर्चेत राहिली. त्याचं कारण ठरलं विशाल पाटील यांनी घेतलेली भूमिका…. विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढली अन् जिंकली सुद्धा… त्यांच्या विजयात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांची भूमिका प्रचंड चर्चेत राहिली. पण सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहिला. तर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात टोकाचे वाद होते. पण आता या दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याचं दिसतंय. हे दोघे एकत्र कसे आले? यावर या दोघांनी भाष्य केलंय. तसंच सांगलीतील लढत कशी होती? पाहूयात…
विशाल पाटील विजयी झाल्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या. यावेळी हे दोघेही त्यांच्यातील नात्यावर बोलते झाले. आधी आमच्यात वाद होते. मात्र मग आम्हाला कळलं की सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी, इथल्या लोकांसाठी आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आम्ही दोघांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. कोरोना काळात अनेक दुरावलेली नाती जवळ आली. तसंच आमचं नातं देखील घट्ट झालं. मी विशाल पाटलांशी चर्चा केली अन् आपण एकत्र आलं पाहिजे, असा प्रस्ताव मांडला आणि त्यांनीही तो मान्य केला, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.
विशाल पाटील यांच्या उमेदवारीची आम्ही खूप आधीपासून तयारी करत होतो. विशाल पाटलांनाच उमेदवारी दिली जाईल. त्यालसाठी आपण प्रयत्न करू, असा शब्द मी दिला होता. तसे प्रयत्नही केले मात्र त्याला यश आलं नाही. पण अपक्ष निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. जनतेनेही त्याला चांगला प्रतिसाद दिला, असं विश्वजीत पाटील म्हणाले.
महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली अन् त्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने विशाल पाटील यांनी बंडाचं निशाण फडकवलं. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला अन् सांगली लोकसभेची जागा जिंकली. या सगळ्यात चर्चेत राहिली ती विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांची दोस्ती…!