राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. या घडामोडींनंतर नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. यानंतर आता राज्यात पुढच्या तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत कुणाला किती जागांवर यश मिळतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे त्याआधी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाडीत जागावाटप कसं ठरतं? हे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आता जागावाटपासाठी महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या गोटातून याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काँग्रेसची येत्या 4 सप्टेंबरला अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबईत काँग्रेस पक्षाकडून जागावाटपासाठी गठीत केलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. रमेश चेन्नीथला यांच्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची 4 ऑगस्टला मुंबईतील द लिला हॉटेल येथे सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, सतेज पाटील, नसीम खान, वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप करत असताना चर्चेमध्ये कुठलीही नमती भूमिका घ्यायची नाही, यासंदर्भात महाराष्ट्र प्रभारी या सर्व प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांशी विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेला कधीपासून सुरुवात करायची या विषयावर बोलणार आहेत. नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन जागावाटपाबाबतच्या चर्चेला कधीपासू सुरुवात करायची, या विषयी बोलणार आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत फार घडामोडी किंवा बैठका अद्याप पार पडलेल्या नाहीत. तर दुसरीकडे महायुतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी गप्पा मारताना जागावाटप निश्चित झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर महायुतीच्या इतर नेत्यांनी जागावाटप अद्याप ठरलं नसल्याचं म्हटलं आहे.