अहमदनगर : कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असतानाही राज्याच्या विकासाची वाटचाल आम्ही चालू ठेवली. त्यामुळेच अडीच वर्षे महाविकास आघाडीने राज्याचा यशस्वी कारभार केल्याचे मत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांना व्यक्त केले. आता सरकार वेगळे आले आहे. त्यामुळे कशा पद्धतीने राज्याचा कारभार चालला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. औरंगाबादची सभा होत आहे कारण आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रितपणे सगळ्या गोष्टींना सगळे सामोरे जाऊ हे सांगण्यासाठीच आजची सभा होत आहे असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. विखे पाटील यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
त्यावर बोलताना त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे कालीचरण आणि धिरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरूनही त्यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सध्या नवीन नवीन महाराज तयार होत आहेत आणि सरकार त्यांना संरक्षण देते आहे. त्यामुळे हा देश बंधूभावांनी चालवायचा की दंगलीने भरलेला करायचा असं वाटून जाणारं हे सगळं वातावरण निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तथाकथित नवीन महाराज तयार होत आहेत. त्यामधील हे बागेश्वर महाराज आहेत.
त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यानंतर आता साईनाथांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेले हे साईबाबांबद्दलचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
जगभरातून लाखो लोक शिर्डीत येतात आणि आपले सगळे दुःख ते विसरतात. काही गटाकडून आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संतांवर आघात करणे हा सनातनी धर्म आहे का ? असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे ही नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे. अशी अनेक वक्तव्य या महाराज मंडळींकडून केली जात आहेत.
मात्र सरकारचं या गोष्टींना प्रोत्साहन असल्यासारखे सध्या राज्यात वातावरण आहे असा घणाघातही थोरात यांनी केला आहे. ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी व वर्णभेद निर्माण करणारी असल्याने यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल तर त्यांचा बंदोबस्त लोकांनी केला पाहिजे असं आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.