Nitin raut Car Accident : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
नितीन राऊत यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात नितीन राऊतांना कोणतीही इजा किंवा दुखापत झालेली नाही. याप्रकरणी नागपुरातील कपिलनगर परिसरात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे काल रात्री प्रचार सभा आटपून घरी जात होते. त्यावेळी नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमध्ये बसलेल्या नितीन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला.
नितीन राऊतांच्या कारचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओत त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. यात तो ट्रक चालक आणि त्यांचे काही सहकारी कार बाहेर येऊन किती नुकसान झाले हे पाहताना दिसत आहेत. हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान काँग्रेस नेते आणि विद्यमान आमदार नितीन राऊत उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. नितीन राऊतांच्या विरोधात भाजपने मिलिंद माने यांना तिकीट दिले आहे. नितीन राऊत यांनी 2019 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद मानेंना पराभूत केले होते. यावेळी दोघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.