नागपूर : देशाची राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख मागण्यांसाठी आता काँग्रेसही आक्रमक झालीय. मोदी सरकारने केलेले नवे 3 कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. नागपूरात काँग्रेसने आज राजभवनाला घेराव घातला. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत हीच प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झालं (Congress Protest against Farm Laws and Fuel price hike in Nagpur).
काँग्रेसने राजभवनच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मोर्चा काढला. काँग्रेसच्या मोर्चात अनेक ट्रॅक्टरही सहभागी झाले होते. काँग्रेसचे दिग्गज मंत्री आणि पदाधिकारी या मोर्चात उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या नागपूर मुक्कामी आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आंदोलनाचं मुख्य केंद्र नागपूरच केलंय. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांपर्यंत आपला कृषी कायद्यांना विरोध दाखवण्यासाठी आपण नागपूर येथे आंदोलन करत असल्याची भूमिका काँग्रेसचे कार्यकर्ते मांडत आहेत.
काळे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित राजभवन घेरावाला जनतेने उंदड प्रतिसाद दिला.
भाजप सरकारने तातडीने हे काळे कृषी कायदे रद्द करत इंधन दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा असंतोषाच्या या वणव्यात भाजप पोळून निघाल्याशिवाय राहणार नाही!#KisanAdhikarDiwas pic.twitter.com/51nAl19xI3
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 16, 2021
बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही 15 जानेवारीलाच घेराव घालणार होतो, पण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आज घेराव घातला. पूर्वी मुंबईत घेराव आंदोलनाचे नियोजन होतं, पण राज्यपाल नागपुरात असल्याने येथे आंदोलन करण्यात आले. 24 तासांमध्ये या घेराव आंदोलनाची तयारी केली. तरीही इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी केली. रोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करुन या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.”
“केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झालेय”
“आम्ही फक्त आंदोलन करत नाहीत. शेतकऱ्यांसाठी आधी काम करतो. केंद्रातील सरकारने काय केलं? दिल्लीत एवढे दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचा माल स्वस्तात खरेदी करण्याची आणि साठवण्यासाठी काही उद्योगपतींनी तयारी केलीय. केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झालेय. शेतकऱ्यांनाही भांडवलदारांचे गुलाम करायला निघालेय. केंद्र सरकारच्या कायद्याला आम्ही राज्यात मोडून काढू. जे शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तेच आम्ही राज्यात करु. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज काँग्रेसने राजभवनावर आंदोलन केलं,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
“दिल्लीत बसलेले राज्यकर्ते गेंड्याच्या कातड्याचे”
यावेळी भाई जगताप यांनी देखील राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं. राज्यपालांनी घटनेचा अनादर केला. त्यामुळे मी आमदार असूनही राज्यपालांचा आदर करत नाही, असं रोखठोक मत जगताप यांनी मांडलं. विजय वडेट्टीवार म्हणाले, “केंद्र सरकारने काळे कायदे करुन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आज राजभवनाला घेराव घालण्यात आलाय. मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. दिल्लीत बसलेले राज्यकर्ते गेंड्याच्या कातड्याचे आहेत. आज राज्यपालांना निवेदन देऊनंही फार फायदा होणार नाही.”
“विदर्भातील 80 टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकेल. दोन दिवसांत तयारी करुन आज एवढा मोठा मोर्चा काढला. पूर्वी भाजप पेट्रोल डिझेल दरवाढीवर आंदोलन करायचे, पण आता त्यांना लाज वाटत नाही. ते शरमही ठेवत नाहीये. काळे कृषी कायदे रद्द केल्याशिवाय केंद्रातील भाजप सरकार खाली खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा 23 जानेवारीपासून एल्गार, आंदोलनाची रुपरेषा ठरली
Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?
Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार
व्हिडीओ पाहा :
Congress Protest against Farm Laws and Fuel price hike in Nagpur