मुंबई : 14 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून सरबत घेत जरांगे यांनी उपोषण सोडले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री नसल्याने वेगळी चर्चा होऊ लागली. तर, कॉंग्रेसने काही प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनाच घेरले आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आणि त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले. तर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंत्रालयातून लाठीचार्जचे आदेश गेल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असा अर्थ होतो. मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. परंतु, सरकारमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. मग, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले नाहीत असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का? असे प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.
राज्य सरकारमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) असे तीन पक्ष आहेत. पण, उपोषण सोडविण्यासाठी फक्त मुख्यमंत्री शिंदेच गेले. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. त्या शब्दाशी भाजप ठाम आहे असा शब्द फडणवीस यांनी दिला पाहिजे असे ते म्हणाले.
ओबीसी समाजाला जे आरक्ष दिले आहे त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी काँग्रेसची भूमिका आहे. परंतु, आरक्षणाच्या खेळात एकनाथ शिंदे यांना पुढे करुन भाजप हा खेळ तर खेळत नाही ना, अशी शंकाही प्रवक्ते लोंढे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यात गेले तर इकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरु केली. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनिल प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष यांच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र झाल्यास शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहतील का? जर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले तर हा आधीच्या सरकारचा निर्णय होता असे भाजपाने म्हणू नये, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला.