लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला बसणारे धक्के कमी होत नाही. माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण भाजपात गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सुरु असलेले हे डॅमेज कंट्रोल अजून थांबत नाही. आता काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपने जोरदार धक्का दिला आहे.
डॉ नितीन कोडवते यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात करणार प्रवेश करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश होत आहे. गुरुवारीच काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. परंतु या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही.
सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुणे लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. 9 इच्छुकांनी मुलाखती देण्याचा सोपस्कार पार पाडला होता. त्यानंतर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते २०१९साली काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. तसेच नितीन कोडवतेंकडे होती. काँग्रेस प्रदेश सचिवची जबाबदारी होती. परंतु तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन ते भाजपत गेल्याची चर्चा आहे.