अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी असंख्य भाविक नेहमी इथे येत असतात. पण येथूनच एक विचित्र मागणी समोर आली आहे. काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अजब मागणी केली आहे. अक्कलकोटमध्ये दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी एस.पी. साहेबांना फोन करा. आमचा कार्यकर्ता गरीब आहे. त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही, असे म्हणत म्हेत्रे यांनी व्यासपीठावरून जाहीर मागणी केली आहे. मात्र यामुळे एकच खळबळ माजली असून चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नव्हे तर अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना देखील धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “आता आमचं डोकं खराब झालं आहे. जे काय होईल ते होईल. एक तर तो राहील नाहीतर मी राहील”, अशी थेट धमकी व्यासपीठावरून म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली.
शंकर म्हेत्रे हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे लहान भाऊ असून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शंकर म्हेत्रे यांनी हे वक्तव्य केले. मात्र त्यांची ही विधानं आणि धमकीमुळे खळबळ माजली असून याप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे सांगत याबाबत आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले शंकर म्हेत्रे ?
अक्कलकोटमध्ये भाजपच्या लोकांचा दोन नंबर धंदा सुरू आहे, मात्र काँग्रेसच्या लोकांचा बंद आहे. याबाबत पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असा आरोप म्हेत्रे यांनी केला. तुम्ही देशाचे माजी गृहमंत्री आहात. आमचा कार्यकर्ता गरीब आहे. त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही.त्यामुळे तुम्ही एसपीना त्याबाबत बोला असे सांगत म्हेत्रे यांनी दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे विनंती केली. धंदे चालू केले तर सगळे धंदे चालू करा किंवा बंद करायचे तर सगळे धंदे बंद करा. उपोषण करून, सगळ्या नेत्यांना सांगून बास झाले, त्याचा काही उपयोग नाही.
पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का?
पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का? असा सवालही म्हेत्रे यांनी विचारला. पोलिसांना भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकसारखेच असायला हवे. आता एवढंच सांगतो, खोट्या केसेस करणं, विधानसभेत बोलून आमच्या कार्यकर्त्यांचे धंदे बंद पाडता. काँग्रेस कार्यकर्त्यांचे हॉटेल बंद व्हावे म्हणून विधानसभेत बोलता का ? मग पुढे वळसंगला जावा, तिथे सर्व चालू आहे. ते का बोलत नाही तुम्ही ? असा सवाल त्यांनी विचारला.
एवंढच नव्हे तर, आता आमचं डोकं खराब झालं आहे. जे काय होईल ते होईल. एक तर तो राहील नाहीतर मी राहील , असे म्हणत काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना व्यासपीठावरून थेट धमकी दिली. कोणी काही काळजी करू नका. कोणाला जो धंदा पाहिजे तो आजपासून चालू करा. काही लागलं तर माझ्याकडे या. आजपासून सर्वजण कामाला लागा, असे ते म्हणाले.