अन्यथा सारथी कार्यालयाचे उद्घाटन होऊ देणार नाही, मराठा संघटना का आक्रमक झाल्या ?

| Updated on: Oct 18, 2022 | 3:16 PM

नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे, 21 तारखेला त्याचा उद्घाटन सोहळा होत आहे.

अन्यथा सारथी कार्यालयाचे उद्घाटन होऊ देणार नाही, मराठा संघटना का आक्रमक झाल्या ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राज्यातील विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी सारथी (Sarathi) संस्थेचे कार्यालय निर्माण केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या नाशिकरोड येथे सारथीचे कार्यालय निर्माण केले असून त्याचा येत्या 21 तारखेला उद्घाटन सोहळा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादाभुसे, अतुल सावे या मंत्र्याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. तसा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक विभागासाठी सारथी कार्यालय असायला हवे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली होती, मुंबईत उपोषण केले त्यावेळी देखील या मागणीचा त्यामध्ये समावेश होता. त्यामुळे मराठा संघटना यावरून निषेध व्यक्त करत आक्रमक भूमिका घेत आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकच्या नाशिकरोड येथे होत आहे.

नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे, 21 तारखेला त्याचा उद्घाटन सोहळा होत आहे.

ज्यांनी विभागात सारथीच्या कार्यालयाची मागणी केली त्यांनाच उद्घाटनाला न बोलविल्याने संभाजी राजे छत्रपती यांचे समर्थक आक्रमक झाले आहे.

सारथी संस्थेच्या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपतींना डावलल्याचा आरोप होत असून कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे.

एकूणच सारथी संघटनेचे उद्घाटन होण्यापूर्वीच वाद निर्माण झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाचा समावेश करण्याच्या हालचाली केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रशासनाने निमंत्रण पत्रिकेत संभाजीराजे छत्रपतींच्या नावाचा उल्लेख का टाळला ? असा सवाल उपस्थित करत मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे.