मुंबई : पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे (Corona) एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केल्या. ते आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. (Corona infection rate may increase in rainy season Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray order to treat patients quickly by knowing symptoms)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, गेल्या वर्षी खासगी डॉक्टर्समध्ये कोविड संसर्गाची मोठ्या प्रमाणवर भीती होती. त्यांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती. त्यावेळी आपल्याकडे मास्क, पीपीई कीट तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा मोठ्या प्रमाणवर तुटवडा होता. परंतु आता या दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ञ, मैदानात उतरले आहेत.
पुढे बोलताना, आपण ‘माझा डॉक्टर’ या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टर्सशी संवाद साधत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. तसेच सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविड्ची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पहीले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे. त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.
पूर्वीचा संसर्ग आणि सध्याचा संसर्ग यात फरक आहे. आत्ताचा संसर्ग हा म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे पसरत असून त्याचा वेग खूप जास्त आहे. शिवाय रुग्णांवरही जास्त कला उपचार करावे लागत आहेत,असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पुढे बोलताना रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे, असा सल्ला त्यांनी नागरिक तसेच डॉक्टरांना दिला. म्युकर मायकोसिस वेगाने पसरतो आहे याचाही संदर्भ त्यांनी याावेळी दिला.
दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय. तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हाच धागा पकडून डॉक्टर्स तसेच लोकांनी सावधानता बाळगली पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.
कोविडसंदर्भात लक्षणांत बदल, दिल्या जाणाऱ्या लसी, लस घेणाऱ्यास असलेल्या सहव्याधी, शरीरात तयार होणारी प्रतीरोधक शक्ती याविषयी व्यवस्थित नोंद होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले. राज्य सरकार प्रथमपासून आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी करीत नाही. त्यामुळे लसीकरणविषयक वरीलप्रमाणे सर्व नोंदी अद्ययावतपणे करीत गेल्यास पुढे चालून अचूक विश्लेषण करणे शक्य होईल. तसेच त्याचा फायदा भविष्यात होईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
दरम्यान, दोन दिवसीय कार्यशाळेत एकूणच कोविडसंसर्गाचे बदलते स्वरूप, गृह विलगीकरण रुग्णांवरील उपचार, मुलांमधील संसर्ग, तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन तयारी करणे, कोविड लसीकरण, म्युकरमायकोसिसवरील इलाज, कोविड व्यवस्थापनातील मुद्दे, प्रयोगशाळेतील चाचण्या, कोविडनंतरचे आजार अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या कार्यशाळेत टास्क फोर्समधील तज्ज्ञ तसेच इतरही काही तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.
इतर बातम्या :
(Corona infection rate may increase in rainy season Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray order to treat patients quickly by knowing symptoms)