नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे मृत्यूचा धोका किती ? वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटबद्दल डॉक्टर काय म्हणाले?; मोठी अपडेट काय ?

| Updated on: Dec 21, 2023 | 1:09 PM

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशभरासह महाराष्ट्रतही पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हेरिएंट नेमका कसा आहे, त्याचा धोका किती आहे, कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’ने डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला.

नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे मृत्यूचा धोका किती ? वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटबद्दल डॉक्टर काय म्हणाले?; मोठी अपडेट काय ?
Follow us on

पुणे| 21 डिसेंबर 2023 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशभरासह महाराष्ट्रतही पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटचे देशभरात रुग्ण आढळले असून त्यापैकी एक रुग्ण महाराष्ट्रात आणि गोव्यातही आहे. याची पहिली केस गेल्या आठवड्यात केरळमध्ये होती तर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्गामध्ये JN1 चा एक रुग्ण आढळला.

या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेने सावधानतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हेरिएंट नेमका कसा आहे, त्याचा धोका किती आहे, कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’ने डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.

कोरोना संपलेला नाही – डॉ. भोंडवे

2022 च्या सुमारास कोरोना संपली अशी हाकाटी सुरू झाली होती. कोरोनाची महामारी संपली आहे परंतु कोरोना संपलेला नाही. कोरोनाचे नित्य नवनवीन व्हेरिअंट हे येतच राहतील. सध्या जो JN1 नावाचा व्हेरिअंट आहे, त्याची लागण सप्टेंबर महिन्यापासून अमेरिकेमध्ये होत असल्याचे दिसले, अनेक देशांमध्ये तो (व्हेरिअंट) पसरला आहे.

८ डिसेंबर रोजी भारतात त्याचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. त्यानंतर देशात इतर राज्यात आणि महाराष्ट्रातही त्याचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन हा कोरोनोचा व्हेरिअंट होता,JN1 हा नवा व्हेरिअंट त्याचा सब व्हेरिअंट म्हणजे उपप्रकार आहे. हा व्हेरिअंट ओमायक्रॉनसारखाच वेगाने पसरतो. पण त्याची मारक शक्ती किंवा त्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रकार खूप कमी आहे. हा विषाणू शरीरात पसरतो, बाधा करतो पण त्यामुळे दाह वगैरे निर्माण होत नाही (ही लक्षणं सुरूवातीच्या कोरोनाच्या व्हेरिअंटमध्ये दिसत होती). न्यूमोनिया सारखे प्रकारही यात फारसे आढळून येत नाही. आत्तार्यंत याचा मृत्यूदर खूप कमी आहे.  ज्यांना पूर्वी होऊन गेला आहे त्यांना देखील किंवा लस घेतली असेल तरी देखील या नव्या व्हेरियंटची लागण होते, असे ते म्हणाले.

कशी होते सुरूवात ?

हा विषाणू शरीरात गेल्यानंतर सर्दी, खोकला, ताप याने सुरूवात होते आणि तो वेगाने पसरतो. सर्दी, शिंकेतून, खोकल्यातून वेगाने पसरतो, असे डॉक्टरांनी सांगितले. जागतिक स्तरावर हा व्हेरिअंट मोठ्या प्रमाणात आढळल्याने, या आजारावर लक्ष ठेवा, पाळत ठेवा असं जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं होतं. आत्ता याचे स्वरूप सौम्य असले तरी भविष्यात तो मारक किंवा गंभीर ठरू शकतो. त्यामुळे भारत सरकारही अलर्ट मोडवर गेलं असून त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले. कर्नाटक सरकारनेही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, असे डॉ. भोंडवे म्हणाले.

आजार अंगावर काढू नका

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून आपल्याकडे सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण आढळत आहेत. आणि कोरोनाचीदेखील हीच लक्षणं आहेत. मात्र आपल्याकडे अनेक लोक किरकोळ आजार समजून याकडे दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात. पण हा आजार वेगाने पसरू शकतो. चाचण्या केल्या नाहीत तर तो किती वेगाने पसरतोय हे समजू शकणार नाही, त्यामुळे सरकारने सतर्कतेचा आदेश जारी केला आहे,असे त्यांनी नमूद केले.