ब्लॅंकेटची चोळी, कमरेखाली पोतं, पाण्याच्या शेवटच्या थेंबासाठी ‘तिचा’ संघर्ष…

| Updated on: Jun 17, 2023 | 6:09 PM

हजारो प्रवाशांच्या गर्दीत ती ही एक प्रवासीच. पण, तिचा प्रवास वेगळा होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या राहिलेल्या पाण्याच्या बाटल्या, त्यातलं पाणी, उष्टावलेलं अन्न खाऊन आपलं पोट भरायची. येणाऱ्या जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या गर्दीतून ती लोकांच्या नजरेत चटकन येत असे.

ब्लॅंकेटची चोळी, कमरेखाली पोतं, पाण्याच्या शेवटच्या थेंबासाठी तिचा संघर्ष...
ATISH LAKSHMAN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

सोलापूर : ब्लॅंकेटच्या कपड्यांची चोळी करून तिनं अलगदपणे छाती झाकून ठेवली होती. कमरेखालच्या भागाला पोत्यानं गुंडाळून घेतलं होतं. हातात एक गाठोड घेऊन ती बस स्थानकावर हताश होऊन भटकत होती. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या राहिलेल्या कचऱ्यातून पाण्याच्या बाटल्या अन् मिळेल ते अन्न खावून आपलं पोट भरायची. हातातलं गाठोडं, बार्शी बस स्थानकावरचा प्लॅटफॉर्म, कुणाची सहानुभूती मिळाली आणि त्यातून मिळणारं जेवण हेच काय ते तीच जीवन. एरव्ही शांत असणारी, पण चुकूनही कुणी तिच्याजवळ गेलं तर तिच्यातली स्त्री जागी व्हायची. बेभान होऊन दगडांचा मारा करायची. अखेर, तिला एक मार्गस्थ भेटला आणि ती शांतपणे प्रवासाला निघाली. उरलेलं आयुष्य उजळविण्यासाठी…

सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी एसटी बस स्थानक. हजारो प्रवाशांच्या गर्दीत ती ही एक प्रवासीच. पण, तिचा प्रवास वेगळा होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या राहिलेल्या पाण्याच्या बाटल्या, त्यातलं पाणी, उष्टावलेलं अन्न खाऊन आपलं पोट भरायची. येणाऱ्या जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या गर्दीतून ती लोकांच्या नजरेत चटकन येत असे.

हे सुद्धा वाचा

कधी बस स्थानकावरच्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या लोकांत ती मिसळून जाई. तर, कधी बार्शीच्या रस्त्यावर वणवण भटकत असे. तशी ती अगदीच शांत. परंतु, तिच्या जवळ जाण्याचा कुणी चुकून प्रयत्न केलाच, तिच्या कामात व्यत्यय आणला तर शिव्या देऊन, वेळप्रसंगी मारण्यासाठी दगड घेऊन धावत सुटायची अगदी बेभान होऊन…

ती कशीही असली तरी तिचा स्थानिक लोकांना लळा लागला होता. त्यामुळेच बार्शीच्या रस्त्यावरच्या हॉटेल मालक असो की व्यापारी तिचं हातावर काहींना काही टेकवत. काही जण सहानुभूतीपोटी खाणं देत तर काही बाटलीभर पाणी. यातीलच एका व्यापारी सलीम भाईं याने तिच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरु केले. तिच्या जीवनातला अंधार दूर करायचं ठरवलं.

सलीम भाई यांनी मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संभव फाउंडेशनच्या आतिश कविता लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधला. आतिश यांनी बार्शीला यायचं ठरवलं. आजपर्यंत तिच्याबद्दल बऱ्याच लोकांनी माहिती दिली होती. पण, तिच्या समोर थांबून फोटो घेण्याचं धाडस कुणालाच करता आलं नव्हतं. त्यामुळे तिला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी आतिश यांनी बार्शीला नियोजन आखलं.

अश्मयुगातला पेहराव

सोलापूरहून त्यांनी एस.टीने बार्शी गाठले. बस स्थानकात पोहोचण्यापूर्वीच त्यांची नजर तिचा शोध घेऊ लागली. एस.टी तून खाली उतरले ते तिच्या शोधात जाणार इतक्यात…! ती सुलभ शौचालयाच्या समोरच्या गर्दीतून वाट काढत आतिशच्या दिशेने येऊ लागली. तिला पाहून एखाद्या अश्मयुगातल्या काळाच्या पेहरावात कुणी समोर उभी ठाकलं असा भास आतिशला झाला.

ती व्याकूळ झाली होती. हताश झाली होती, अन्नाच्या शोधात होती, तिच्या चेहऱ्यावर भुक होती, मनोयात्रींच्या पोटात आग कशी पडलेली असते हे आतिष यांनी जवळून अनुभवलं आहे. त्यामुळेच जेव्हा मनोयात्रीला पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांना डाळ भात किंवा बिस्किट पाण्याची व्यवस्था करतात. त्यांनी आपलीकडील पाण्याची बाटली तीच्या हातात दिली. तिने ती बॉटल आपल्या गाठोड्यात टाकली आणि ती मार्गस्थ झाली.

काळजाचा ठोका चुकला

जवळपास एक पंधरा दिवसांच्या अंतराने आतिष यांना सोलापूरातील काही मनोयात्रीबद्दल कळलं होतं त्यापैकी तीन जणांना शोधण्यास त्यांना यश आलं. त्यातीलच ही एक. तीचं नाव मंगला. तिला पाहून आतिष यांच्याही काळजाचा ठोका चुकला. ते सोलापुरात परतले. त्यांनी रुग्णवाहिकेची तजवीज केली. दोन मनोयात्रींना घेऊन ते पुन्हा बार्शीत दाखल झाले.

जीवनात आनंद फुलविण्यासाठी

मंगलासह तीन मनोरुग्णाच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी त्यांची गाडी आता बुलडाणाच्या दिव्य सेवा प्रकल्पाच्या दिशेने निघाली. त्यापूर्वी मंगला हिच्या पुनर्वसनासाठी लागणारी सर्व आवश्यक ती कायदेशीर प्रोसेस त्यांनी पूर्ण केली होती. बुलढाण्याच्या दिशेने प्रवास सुरू असताना वाटेत ती आरडाओरडा करत सुटली. दरवाजा आदळत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती.

अंधारलेल्या वाटेकडून प्रकाशमय दिशेकडे

थोड्या वेळाने ती शांत झाली. आतिष यांच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे एकटक पाहत इशाऱ्याने ती पाणी मागू लागली. एका लिटर पाणी बॉट्लमधील पाण्याचा शेवटच्या थेंबापर्यंत ती पाणी ढोसत होती. पाणी पिऊन झाल्यानंतर रिकामी बॉटल बाजूला सारून ती शांत झाली. आता ती निघाली होती पुढील प्रवासाला. अंधारलेल्या वाटेकडून अशोक काकडे यांच्या दिव्य सेवा प्रकल्पात, आपलं उरलेले जीवन प्रकाशमय करायला.