नंदुरबार : महाराष्ट्रात लॉकडाऊनची चर्चा (Maharashtra second lockdown) सुरु असताना, तिकडे नंदुरबारमध्ये (Nandurbar) त्याची झलक पाहायला मिळत आहे. कारण नंदुरबारमध्ये आजपासून 15 एप्रिलपर्यंत दिवसा संचारबंदी (lockdown) करण्यात येत आहे. दुपारी 1 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. सकाळी सातपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसोबत काही खाजगी आस्थपणा सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. भाजीपाला, फळे तसेच नाशवंत वस्तूंची दुकानं सुरु ठेवण्यात आली आहे. (Curfew in Nandurbar district, maharashtra moving towards second lockdown covid19 update)
दुपारी एकनंतर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कडक संचारबंदी आहे. आज सकाळपासूनच संचारबंदीमुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी होती. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीदेखील संचारबंदीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केले आहे.
जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सध्या बेडदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीत कोरोना नियंत्रणासाठी किती मदत होते हे तर येणारी वेळच सांगेल. सध्या तरी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीत कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी नागरिकांनी देखील प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे.
सकाळच्या सत्रात नागरिकांनी काही प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती, परंतु एकनंतर नागरिक आणि व्यावसायिकांनी पहिल्या दिवशी 100% दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केलं. सकाळी सात ते एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसह भाजीपाला, फळे आणि नाशवंत पदार्थांची दुकाने खरेदी-विक्रीसाठी उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. एक वाजल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद झाल्याचे चित्र आहे.
संचारबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, जिल्ह्यातील वाढत्या कोव्हिड19 (covid-19) परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. संचारबंदीदरम्यान जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पुढील पंधरा दिवस संचारबंदी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे.
VIDEO : गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी काय म्हणाले होते?
Maharashtra second lockdown : येत्या 2 एप्रिलला मर्यादित लॉकडाऊनची शक्यता, नियम काय असतील?
EXCLUSIVE : Maharashtra second Lockdown : तूर्तास लॉकडाऊन नाही, पण वाटचाल त्याच दिशेने : राजेश टोपे
(Curfew in Nandurbar district, maharashtra moving towards second lockdown covid19 update)