मागील सीटवर बसल्यानंतरही सीटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे.
Image Credit source: social media
मुंबईः टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी सीटबेल्ट (Seatbelt) बांधण्याचा धडा घेतलाय. अपघाताच्या (Road Accident) वेळी ते मागील सीटवर होते. सीटबेल्ट बांधला नव्हता. मागे बसल्यानंतरही सीटबेल्ट बांधणं आवश्यक असताना हा नियम सर्रास पाळला जात नाही. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर ही बाब अधोरेखित झाली. विविध संस्था यावर सखोल अभ्यास करत आहेत. सेव्हलाइफ फाउंडेशनच्या अभ्यासात मोठा निष्कर्ष समोर आलाय. मागे बसणारे 98.2% लोक सीट बेल्टचा वापर करतच नाहीत.
सर्वेक्षणानुसार, 77% लोकांना मागे बसल्यानंतर सीटबेल्ट लावला नाही तरी पोलिसांनी रोखलेलं नाही. तर 37.8 % लोकांच्या मते, मागची म्हणजेच रीयर सीटवर बसल्यास बेल्ट बांधावा लागत नाही. 24% पालक मुलांना सीटबेल्ट बांधत नाहीत. सर्वेक्षणाच्या या आकड्यांवरूनच आपण किती निष्काळजी आहोत, हे दिसून येतं.
सीटबेल्टचं गणित काय?
- समजा कार 60 किमी वेगाने चालतेय. एखाद्या भिंतीवर ती आदळली तर ती काही सेकंद थांबते. पण कारमधील व्यक्ती, गोष्टींवर या वेगाचा परिणाम होतो. कारमधील गोष्टींचा वेगही शून्य होत नाही, तोपर्यंत परिणाम दिसतात. विंडशील्ड आणि डॅशबोर्डवर याचा परिणाम दिसतो.
- अपघात स्थितीत सीटबेल्ट हाच एकमेव उपाय आहे. बसलेल्या व्यक्तींना पुढच्या बाजूने ढकलणाऱ्या वेगाचा दबाव कमी केला जाऊ शकतो.
- सीटबेल्टमुळे शरीर मागील बाजूने रोखून ठेवण्यास मदत करतो. झटका लागला तरीही शरीराला पुढील बाजूने झुकण्यापासून रोखले जाते.
- नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनच्या अभ्यासानुसार, सीटबेल्टचा वापर केल्यास मृत्यूचा धोका 65 टक्के कमी होतो. तर चालकासमोरील एअरबॅगमुळे 8% धोका टळतो.
- सीटबेल्ट लावला असेल आणि एअरबॅगही वेळेवर उघडली तर मृत्यूची शक्यता 68 टक्क्यांनी कमी होते.
- सेंट्रल मोटर्स व्हेइकल रुल्सनुसार, गाडी चालवताना ड्रायव्हर आणि इतर सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. अन्यथा 1 हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो.
सीटवबेल्ट लावणं का आवश्यक आहे?
- NCRB च्या आकड्यांनुसार, 2021 मध्ये देशरातील रस्ते अपघातात 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सुमारे 426 मृत्यू.
- दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, नियमानुसार सीटबेल्ट बांधला तर रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करता येते.
– NCRB च्या आकड्यांवरून तरी आपण बोध घेतला पाहिजे. वाहतुकीचे नियम सुजाण होऊन पाळू शकतो.