मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याचवेळी काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांच्या मागे महाशक्ती उभो होती. तीच महाशक्ती यावेळीही अजित पवार यांच्यामागे उभी होती हे आता समोर येत आहे. राजकारणातील ‘पैलवान’ अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांनाही ‘या’ महाशक्तीने राजकीय पटलावर चारीमुंड्या चीत केलेय. अजित पवार यांच्या मागे शक्ती उभी करून या महाशक्तीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचाच गेम केला आहे. जी खेळी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खेळण्यात आली होती तीच खेळी शरद पवार यांच्याविरोधात खेळण्यात आली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2 जुलै रोजी अचानकपणे झालेल्या या घडामोडींमुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आगामी निवडणूक पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढविणार असल्याची घोषणा केली. तर, शरद पवार यांनी राष्ट्रवादी हा पक्ष आपण स्थापन केला असून त्यावर कुणीही दावा सांगू शकत नाही. तसेच, याबाबत आपण कोर्टात जाणार नाही असेही सांगितले होते.
मात्र असे असले तरी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच 30 जून रोजी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती अशा माहिती आता समोर आली आहे. या याचिकेवर राष्ट्रवादीच्या 40 आमदार आणि खासदार यांच्या सह्या आहेत.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष निवडण्यात आल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आता थेट शरद पवार यांच्या पक्षावरच दावा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 30 जून रोजीच अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत असे या याचिकेत म्हटले आहे.
दुसरीकडे शरद पवार गटानेही निवडणूक आयोगाकडे एक ईमेल पाठविला आहे. यामध्ये पक्षविरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर कारवाई करावी असे म्हटले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची न्यायालयीन लढाई सुरु झाली होती.
हे दोन्ही गट त्यावेळीही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने आमदारांचे संख्याबळ पाहून शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाबाबत दिलेला निर्णय पाहता आताही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडेच जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.