आला रे आला गोविंदा आला…. आज दहीहंडीचा सण… श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरानगरी काल जन्माष्टमी साजरी झाली. तर आज दहीहंडीच्या सणासाठी ही मथुरानगरी सजली आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आज सर्वत्र ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष पाहायला मिळेल. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत गोविंदा थर लावतील अन् ‘गोविंदा गोपाळाच्या’ जयघोषात दहीहंडी फोडली जाईल. त्यामुळे मुंबईतील रस्त्यारस्त्यावर दहीहंडीचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमांना सेलिब्रिटीदेखील हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रभरात दहीहंडीचा उत्सव साजरा होतोय.
आज दिवसभर मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. बोरिवली पूर्व देवीपाडा मैदानावर प्रकाश सुर्वे त्यांचा मुलगा यांच्या ‘तारामती चॅरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून भव्य असा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, डान्सर गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे
दहीहंडीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळनंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत या भागात मोठी गर्दी होते. त्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजेनंतरनंतर दहीहंडी फुटेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
पुण्यात दहीहंडीसह गणेशोत्सवात लेसर वापरास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई केली जाणार आहे. पुढील साठ दिवस शहर परिसरात लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत. या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासूनच सुरू झाली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येईल.