संतोष जाधव, धाराशिव: 40 तास उलटून गेले. काळ्या भुईवर हे पांढरं विष पडलंय. गारा नव्हेत हे विषच आहे, उभ्या पिकांना खाल्लं, अजूनही जमिनीत जिरेना, कुणीतरी या.. हे पांढरं विष शिवारातून उचलून फेका, शेताची ही अवस्था आता पहावंना… अशी आर्त हाक विनवणी शेतकरी करीत आहेत. धाराशिव (Dharashiv) धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकासह आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 40 तास उलटून गेले तरी गारांचा खच तसाच आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी व गारपितने ज्वारी नुकसान झाले आहे. शिराढोण, वाडी बामणी, केशेगाव, बोरी या भागात मोठे नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर शेतातील उभी पिके वाढणार नसल्याने ती काढून टाकावी लागणार आहेत. शेत जमिनी पुन्हा नीट करण्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे त्यातच मजुरीचे दर वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पंचनामे सुरु केले आहेत तर काही भागात अजून सुरु झाले नाहीत. सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
टरबूज, आंबा, ड्रॉगन फ्रुट यासह ऊस, ज्वारी हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन अद्याप एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी आला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्या दौरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी अशी हाक शेतकऱ्यांनी दिली आहे..
धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे व गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली आहे. या पावसाचा 71 गावांना फटका बसला असुन 38 घरांची पडझड झाली आहे तर 3 नागरिक जखमी झाले आहेत.
काल दिवसभरात केलेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांच नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताना पाठविला आहे. आजही दुसऱ्या दिवशी पंचनामे सुरु आहेत.
धाराशिव व उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झाले.
20 मोठी व 900 कोंबडी पिल्ले दगावली आहेत. जिरायत क्षेत्र 1 हजार 74 हेक्टर, बागायत क्षेत्र 835 हेक्टर व फळबागांचं 662 हेक्टर परिसरात नुकसान झालंय.