जळगाव : 22 ऑगस्ट 2023 | जळगाव शहरातील कांचन नगरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेजारी निधन झालेल्या एका वृद्धाच्या दशक्रिया विधी करण्यासाठी घर देणाऱ्याला आपल्र घर गमवावे लागले. या घराचे मालक सेंटिंगचे काम करतात. आधीच अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यात घर गमावल्यामुळे घर मालकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या घरमालकाने या प्रकरणी महापालिकेला दोषी ठरवले आहे. अग्निशमन विभागाचा बंब उशिराने पोहोचला. त्यामुळे आपल्याला घर गमवावे लागले असा आरोप घर मालकाने केला आहे.
सुभाष भाऊलाल बाविस्कर असे या दुर्दैवी घर मालकाचे नाव आहे. बावीस्कर यांच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्घाचे निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीचा आज कार्यक्रम होता. त्यामुळे शेजारच्यानी स्वयंपाक करण्यासाठी बाविस्कर यांचे घर स्वयंपाकासाठी मागितली होती.
शेजारचे घर त्यात त्यांच्यावर दुःखाचा प्रसंग असल्याने बाविस्कर यांनी आपले घर स्वयंपाकासाठी दिले. गावातील काही महिला स्वयंपाक करत होत्या. दुसऱ्या घरात श्राद्धाचे काम सुरु होते तर या घरात जेवणाची तयारी होत होती.
स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे घरातील गॅस लिक झाला. त्यामुळे काही क्षणातच आग लागली. काही सेकंदातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीमध्ये त्या खोलीत असलेले सर्व कपडे, संसार उपयोगी साहित्य खाक झाले. श्राद्धासाठी जमलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाला दिली. त्यांनी आपापल्या पद्धतीने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्याबाहेर गेली होती.
सुभाष बाविस्कर हे सेंटिंगचे काम करतात. त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्यातच ही दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले आहे. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब उशिराने पोहोचला. त्यामुळे आगीत संपूर्ण घर खाक झाले असा आरोप आगीत नुकसान झालेल्या घराचे मालक सुभाष बाविस्कर यांनी केला आहे.
दरम्यान, सुभास बाविस्कर यांना शासनाने मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या आगीमध्ये शेजारील काही घरांचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.