“याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी…”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा टोला

| Updated on: Dec 18, 2024 | 2:01 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी..., ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा टोला
Follow us on

Eknath shinde On Devendra Fadnavis Uddhav Thackeray meet : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. यानंतर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यातच काल नागपुरात हिवाळी अधिवेशनात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.

“याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट”

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो. विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात. पण मी हे चित्र पाहिल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणं गैर नाही. पण याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट अशी ही परंपरा आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

“विरोधात निकाल लागला की ईव्हीएमवर आरोप होतात”

यावेळी एकनाथ शिंदेंनी ईव्हीएमला विरोध करण्यावरुनही विरोधकांवर टीका केली. “जेव्हा महाविकासआघाडीच्या बाजूने निकाल लागतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं. निवडणूक आयोग चांगलं असतं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टही चांगलं असतं. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून विरोधक हेच करत आहेत. २००४,२००९ मध्ये ईव्हीएमवर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो करता”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“यावर सुप्रीम कोर्टानेही तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही आणि हरता तेव्हा आमच्याकडे येता. ही दुटप्पी भूमिका आहे. लोकसभेत यश मिळाल्यानंतर तुम्ही ईव्हीएमबद्दल बोलला नाहीत. निकाल बाजूने लागला की evm चांगला आणि विरोधात लागला की वाईट असे त्यांनी विचारले. औमर आब्दुल्ला यांनी सुध्दा काँग्रेसला फटकारले आहे”, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

“काँग्रेसने जनादेशाचा अपमान करू नये”

उद्धव ठाकरेंनी केलेली मागणी हास्यास्पद आहे. हे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान करण्यासारखे आहे. हे घटनात्मक पदाबद्दल बोलणे योग्य नाही. त्यांच्या नियुक्ती वर बोलणे योग्य नाही. काँग्रेसने जनादेशाचा अपमान करू नये, नाहीतर जनता घरी बसवेल, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.