शंकर देवकुळे, सांगली | सांगलीतल्या पाटील कुटुंबावर आज जणू काही आभाळ कोसळल्याची स्थिती आहे. ज्याच्या येण्यानं घरात समृद्धी नांदू लागली. ज्याच्यामुळे घरात प्रेम-जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. ज्यानं 30 वर्षांपासून घरातल्या माणसांना बांधून ठेवलं, गावातल्या लोकांकडून आदर, मान, प्रेम मिळवलं, त्यानं अचानक एक्झिट घेतल्यानंत सांगलीतल्या कुटुंबावर आज शोककळा पसरली आहे. त्याचं नाव होतं बदाम. सांगलीतल्या येडेमच्छिंद्र येथील पाटील कुटुंबातला सगळ्यांचा लाडका बदाम बैल याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बदाम बैलाची अख्ख्या सांगलीत एक वेगळीच ओळख होती. ती म्हणजे त्याला माणसासारखा एकट्याने प्रवास करता यायचा. घरापासून शेतापर्यंत आणि शेतापासून घरापर्यंत विनामालक दररोज ४ किलोमीटर प्रवास करायचा. जाताना व येताना डाव्या बाजुनेच प्रवास ठरलेला. तात्या शेतात जाताना बदामला सोडायचे व ते सायकल किंवा मोटारसायकल वरुन पुढे शेतात जायाचे. बदाम चिंचेचा मळा. येडेमच्छिंद्र गाव.कराड- तासगांव रस्ता पार करुन शेतात पोहचायचा. तिथले काम झाले की पुन्हा सायंकाळी पाच वाजता परतीचा प्रवास ठरलेला. पण या प्रवासात बदाम चा कोणालाच त्रास नाही. अनोळखी व्यक्ती बैल सुटलाय म्हणून ओरडायचे. पण तेथील लोकांनी बदाम ची कहाणी सांगितली की, ते ही अवाक् होऊन बदाम कडे बघतच उभे राहयाचे. गेले ३० वर्षे अविरत तात्यांच्या शेतात कष्ट करुन माणसाळलेल्या बदाम वर सर्वांचेच प्रेम होते.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील चिंचेच्या मळ्यात राहणारे सुरेश पाटील (तात्या) यांच्या घरीच बदाम लहानाचा मोठा झाला. बदामने पाटील कुटुंबासह सर्वांनाच लळा लावला होता. चिंचेच्या मळ्यात राहणाऱ्या तात्यांची शेतजमीन कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर गावालगत आहे. आपल्या वागण्यातून परिसरात नेहमीच चर्चेत राहिलेल्या बदाम च्या पायात लक्ष्मी आहे. तो आपला देवच आहे अशी मोठी श्रद्धा पाटील कुटुंबाची होती. सर्व काही सुरळीत व आनंदात असताना वयोमानानुसार ‘बदाम’ बैलाने सर्वांना अलविदा करीत घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. पाटील कुटुंबियांनी रितसर रक्षाविसर्जन करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून बदाम ला श्रद्धांजली अर्पण केली.
पाटील कुटुंबियांनी ‘बदाम’ ला आपला कुटुंब सदस्यच मानले होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर माती सावरण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतरचे दशक्रिया व उत्तरकार्यविधी रितसरच करणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.