पाणी पिण्यासाठी आले अन् विहिरीत पडले; दोन दिवसानंतर काळविटाची विहिरीतून सुखरुप सुटका

| Updated on: Apr 28, 2022 | 2:40 PM

पाणी पिण्यासाठी आलेले काळविट विहीरीत पडल्याची घटना बिड जिल्ह्यतील आर्वी परिसरातून समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्तकतेमुळे या काळविटाचे प्राण वाचले. तब्बल दोन दिवस काळविट विहिरीत होते.

पाणी पिण्यासाठी आले अन् विहिरीत पडले; दोन दिवसानंतर काळविटाची विहिरीतून सुखरुप सुटका
Follow us on

बीड : उन्हाचा कडाका (Temperature) चांगलाच वाढला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच आता जंगलातील पाणवठे देखील अटू लागले आहेत. जंगलातील (forest) पाण्याचे स्त्रोत अटल्याने वन्यप्राण्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जंगलात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने आता वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीची वाट धरली आहे. पाण्याच्या शोधात ग्रामीण भागात प्राण्यांनी शिरकाव केल्याच्या अनेक घटना पहायला मिळत आहेत. या प्राण्यांमध्ये बिबट्यापासून ते हरणापर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. अनेकवेळा पाण्याच्या आणि शिकारीच्या शोधात गावात आलेल्या बिबट्याकडून मानसावर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही घटनांमध्ये पाण्याच्या शोधात असलेला प्राणी विहीरीत पडल्याने त्याला आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील आर्वीमधून समोर आली आहे. पाण्याच्या शोधात असलेले एक काळविटाचे (Deer) पिल्लू पाण्यात पडले. दोन दिवसांनंतर त्याला विहिरीतून  बाहेर काढण्यात यश आले आहे.

प्राणीमित्राच्या मदतीने वाचले  प्राण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाण्याच्या शोधात असलेले एक काळविटाचे पाडस आर्वी परिसरातील एका विहिरीत पडले होते. मात्र परिसरात फारशी वर्दळ नसल्याने हे पाडस विहिरीत पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. हे पाडस गेल्या दोन दिवसांपासून विहिरीतच होते. अखेर या परिसरात आलेल्या शेतकऱ्याच्या लक्षात ही घटना आली. त्याने तात्काळ प्राणीमित्राला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच  प्राणीमित्र सिद्धार्थ सोनावणे हे घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नानंतर या काळविटाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल दोन दिवस पाण्यात राहून देखील काळविटाचे हे पिल्लू सखुरूप असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढला

मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढला असून, पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.  उन वाढल्याने नागरिक घरी राहण्यासच पसंती देत आहेत. ग्रामीण भाग वस पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतात आणि जंगलातील पाणीसाठे वाढत्या उन्हामुळे अटल्याने अनेक वन्यप्राणी गावाकडे पाण्याच्या शोधात धाव घेतात, त्यातून अनेकदा असे अपघात होतात. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे या हरणाच्या पिल्लाचे प्राण वाचले, मात्र अनेकदा अशा अपघातात प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो.