ईव्हीएम संदर्भात शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक; ‘त्या’ आमदाराची राजीनाम्याची तयारी

| Updated on: Dec 10, 2024 | 12:37 PM

Sharad Pawar Home Meeting About EVM : दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल यावर चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं? कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? वाचा सविस्तर बातमी......

ईव्हीएम संदर्भात शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक; त्या आमदाराची राजीनाम्याची तयारी
शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी
Follow us on

राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राजधानी दिल्लीत आज पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पराभूत नेते आणि शरद पवार यांच्यात ही बैठक पार पडली. आज किंवा उद्या पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचीही शक्यता याबाबत या बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप वार्पे, खडकवासल्याचे सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे रमेश बागवे हे या बैठकीला उपस्थि होते. मतदार यादीतील घोळ , वाढलेली मते , ईव्हीएमबाबत पराभूत उमेदवार, शरद पवार आणि सिंघवी यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली.

आज रात्री पुन्हा ईव्हीएम संदर्भात बैठक

शरद पवार यांच्या घरी आज रात्री पुन्हा महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ईव्हीएम संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आज रात्री आठ वाजता बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

जानकरांची राजीनाम्याची तयारी

माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. माळशिरसमधील मारकडवाडी गावातील लोकांना ईव्हीएमवर संशय आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आल्याने हे मॉक पोलिंग झालं नाही. उत्तमराव जानकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

आज आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. राज्यात संशयाचं वातावरण घोंगावत आहे. शरद पवार यांनी आमची मत जाणून घेतली. लाखाचा फरक पडत असेल तर मी माझा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी माझी मागणी आहे. आज रात्री बैठक होऊन पुढील दिशा ठरवू, असं जानकर म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनीही दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवर थोरातांनी माध्यमांशी संवाद साधला. आज मी शरद पवार यांची भेट घेतली. मी काल मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील भेट घेतली. महाराष्ट्राचं राजकारण, आगामी दिशा यावर चर्चा झाली. संघटनात्मक बदल बाबत काही चर्चा झाली नाही. राज्यात सगळ्यांच्या मनात शंका, संशय आहे. भाजपएवढी पुढे कशी जाऊ शकते म्हणून चर्चा सुरू आहे. अनेक गावं म्हणत आहेत की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे. सुप्रीम कोर्टात जायचं की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काय अडचण आहे?, असं थोरात म्हणाले