मुंबई : 9 ऑक्टोबर 2023 | भाजपचे महाराष्ट्रातले हेविवेट नेते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मात्र, या नेत्याने आता दिल्लीत जावं अशी विधाने त्यांच्या सहकारी पक्षातील आमदारांकडून येताहेत. या विधानापासून ते टोलपर्यंत विरोधकांच्या टार्गेटवर सध्या देवेंद्र फडणवीसच आहेत. शिरसाट यांच्यानंतर आमदार मनिषा कायंदे यांनीही असंच विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन काम केले तर महाराष्ट्राच्या नाव मोठं होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या नाव मोठं होईल, असं त्या म्हणाल्यात. तर, टोलमुक्तीवरुन राज ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगलाय.
फडणवीसांनी दिल्लीत जावं या संजय शिरसाट यांच्या विधानानं नवा वाद सुरु झाला. भाजपनं शिरसाट यांना आपल्या क्षमतेनुसार बोलण्याचा सल्ला दिला. हा वाद थांबत नाही तोच शिंदे गटाच्या मनिषा कायंदे यांनीही फडणवीस दिल्लीत गेल्यास मराठी माणसाला आनंदच होईल, असं विधान केलं. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी तो निर्णय हायकमांड करेल असं म्हटलं.
शिरसाट यांनी आपल्या विधानावर खुलासा केला. मात्र, शिरसाट सुद्धा फडणवीस सारख्या नेत्यांना सल्ला द्यायला लागल्याचं म्हणत राऊतांनी फडणवीसांना डिवचलं. मविआ सरकारमध्ये जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीही फडणवीसांच्या दिल्ली जाण्यावरुन मिश्किल टीका केली होती.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही फडणवीसांच्या विधानावर टीका केलीय. ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब आता तुम्हीच काय ते करा. महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून. महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री असं कसं बोलू शकतात, असा सवाल तिनं उपस्थित केलाय.
दिल्लीचा विषय थांबत नाही तोच टोलच्या विधानावरुन फडणवीस पुन्हा विरोधकांच्या टार्गेटवर आलेत. सुप्रिया सुळे यांनी देशात एक अदृश्य शक्ती आहे. देवेंद्र फडणवीस यांनादेखील या अदृश्य शक्तीने हाफ मुख्यमंत्री केले. त्यांच्यावर अन्याय केलाय. मी त्यांच्यासाठी लढणार आहे. कर्तृत्वान असेल तर महाराष्ट्र न्याय देईन मात्र ओरबाडून घ्यायचं नसतं, अशी खरमरीत टीका केलीय.