सांगलीः लावणी कलावंत गौतमी पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे यासाठी सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दलित महासंघाच्यावतीने लावणी कलावंत गौतमी पाटील यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले. गौतमी पाटील यांची लावणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी क्रेझ आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नृत्यांवर लावण कलाकार आणि काही संघटनांकडून त्यांच्यावर अश्लीलतेचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणीही जोर धरला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव गौतमी पाटील यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये दलित महासंघटनेतर्फे त्यांना संरक्षण मिळावे यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
सांगली येथे दलित महासंघाने गौतमी पाटील हिच्या बाजूने उभा राहून त्यांना पोलीस बंदोबस्त मिळावा अन्यथा दलित महासंघाच्यावतीन निदर्शने करत गौतमी पाटील यांना संरक्षण मिळाले नाही तर दलित महासंघाच्या युवकांसोबत तिच्या होणाऱ्या कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त करू असा इशारा दलित महासंघाने दिला आहे.
लावणी नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचे चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम असला की, त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी होते. त्यामुळे अनेकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे अनेकदा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला आहे. त्यातच गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाला जुन्या लावणी कलाकारांकडून आणि काही संघटनांकडून विरोध होत असल्यामुळेही त्यांना संरक्षण देण्याची मागणी दलित महासंघाने केली आहे.
लावणी कलाकार गौतमी पाटील सध्या कलासंस्कृती आणि सोशल मीडियावरही त्या प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असल्याने आणि त्यांच्याविरोधातही त्यांचे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी वाढत असल्याने दलित महासंघाने त्यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे.