अजित पवारांकडून पुन्हा एकदा बारामतीतून न लढण्याचे संकेत, म्हणाले “मी उमेदवार देईन तो…”

| Updated on: Oct 04, 2024 | 5:53 PM

आता अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य केले.

अजित पवारांकडून पुन्हा एकदा बारामतीतून न लढण्याचे संकेत, म्हणाले मी उमेदवार देईन तो...
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

Ajit Pawar on Baramati Vidhansabha election : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका न लढण्याचे आदेश दिले आहेत. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोललं जात आहे. तर काही वेळा अजित पवारच बारामतीतून उभे राहणार असल्याचे बोललं जात आहे. पण आता अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य केले.

“गेल्यावेळी जेवढे आमच्या परिवारातील लोक तुम्हाला भेटायला येत होते, तेवढं यावेळी जास्त कोणी येणार नाही. उलट, यावेळेस मी जो उमेदवार देणार आहे, त्या उमेदवाराच्याच कामाकरिता… त्याच पद्धतीने त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण करणार आहेत, ते त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल”, असे अजित पवार म्हणाले.

“उमेदवार अर्ज भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगेन”

मी जसं मागे म्हटलो होतो की मी जसा एकटा पडलोय, तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आज ते पूर्ण करत नाही. ज्यावेळेस उमेदवार अर्ज भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगेन. त्यावेळेस तुम्हालाही समजून येईल, असे एकंदरीत चित्र आहे. लोकसभेवेळी तुम्ही आमच्यावरती रागावला होता, कांदा निर्यातबंदी केली म्हणून.. आता कांदा निर्यात बंदी उठवली आहे. लोकसभेवेळी अल्पसंख्याकांची मतं आम्हाला मिळाली नाहीत असं का केलं? मी कधी जातीच राजकारण केलं नाही, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले.

कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवणार?

दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत बारामतीत कुटुंबातील उमेदवार देऊन मी चूक केली. राजकारण घरात आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या विरोधात उभं करून मी चूक केली. हे व्हायला नको होतं, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यानंतर अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले. अजित पवार हे कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.