Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत सुपरहिट ठरली. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिना १५०० रुपये रक्कम जमा करण्यात आली. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेच्या हफ्ता २१०० रुपये करु असे आश्वासन दिले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल, अशी चर्चाही पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या याजनेतील लाभार्थी महिलांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजना, अर्थसंकल्प यांसह विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. माझ्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्त्वाचा असतो. कॅबिनेट, प्री कॅबिनेट असते. आता अर्थसंकल्प सादर करायचा आहे. उद्या शिवजयंती आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रम घेतोय. उद्या शिवनेरीला मी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे सकाळी 7 ला जाणार आहोत आणि नतमस्तक होणार आहोत. आमचा शिवस्वराज्य सप्ताह आहे, असे अजित पवार म्हणाले.
“मला या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा”, असे आवाहन अजित पवारांनी केले.
“यापुढेही जे जे सहकारी दुर्लक्षित आहेत, त्यांना आपल्यासोबत घ्यावं. पुढे मी नांदेड, परभणीला जाणार आहे. तिथेही पक्षप्रवेश आहेत. हवशे नवशे गवशे सगळे येतात आणि म्हणतात की मला महामंडळ द्या, मला DPDC च हे द्या, पण आपण काय केलं याचा वापर करा. स्वराज्य सप्ताहच्या निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत”, असेही अजित पवारांनी म्हटले.
दरम्यान याआधीही अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी कबुली दिली होती. “लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत”, असे अजित पवार म्हणाले. “पण या योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले होते.