Ajit Pawar On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या विविध जिल्ह्यात शांतता रॅली काढताना दिसत आहे. आता मराठा आरक्षण या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजं, असे स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं. यावेळी अजित पवारांनी यामागील सविस्तर कारणही सांगितलं.
अजित पवारांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आरक्षणावर तुमचं मत काय? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजं, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग आहे. त्यांनाही इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी शिक्षणासोबतच नोकरीमध्येही आरक्षण मिळायला हवं”, असे स्पष्टपणे सांगितले.
“मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळायला हवं की नको, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची, घटक पक्षांची बैठक बोलवावी. या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करावी. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत ज्यावेळेस अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस विरोधाला विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राने कधीही घेतलेली नाही. याबद्दल सर्वांनी समजंस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कारण महाराष्ट्र हा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राकडे बघण्याचा इतर राज्यांचाही तोच दृष्टीकोनही आहे”, असेही अजित पवार म्हणाले.
“काही आठवड्यांपूर्वी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. पण दुर्दैवाने त्यात काही पक्षाच्या नेत्यांना यायला जमलं नाही. काही दिवसांपूर्वी केंद्राचे अधिवेशन संपलं त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करायला हवं. या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतल्यावर मराठा समाजावर अन्याय होणार नाही, ही खबरदारी घेऊन हा निर्णय घ्यायला हवा”, असेही अजित पवारांनी सांगितले.