“पुरावा नसताना…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी मौन सोडले

| Updated on: Jan 09, 2025 | 5:50 PM

माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. जे दोषी असतील, त्यांची अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही. त्यांना कडक शिक्षा केली जाईल. यामुळे वेगळ्या प्रकारचा मेसेज दिला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

पुरावा नसताना... धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी मौन सोडले
ajit pawar dhananjay munde
Follow us on

Ajit Pawar On Dhananjay Munde Resignation : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. आता अखेर या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केले.

अजित पवारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “तीन एजन्सी या प्रकरणाची चौकशी करतात. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई होईल. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“कोणाचीही गय करण्याचे कारण नाही”

“कोणत्याही चौकशीत जर एखाद्यावर आरोप झाला तर आज एसआयटीची चौकशी सुरु आहे. आज सीआयडीची चौकशी सुरु आहे. न्यायलयीन चौकशी सुरु आहे. आता या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथे चौकशी करत आहेत. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलेले आहे की या चौकशीदरम्यान जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते सिद्ध झाले तर त्यांच्यावर ताबडतोब चौकशी होईल. या संदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यात कोणताही पक्ष वैगरे न बघता, जर कोणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती यात दोषी असतील, तर कोणाचीही गय करण्याचे कारण नाही, असेही मी मुख्यमंत्र्‍यांना सांगितले आहे. त्यांनी मी त्या देखील प्रकारचा आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे चौकशी सुरु आहे”, असेही अजित पवारांनी म्हटले.

आरोपी सापडायला थोडा विलंब झाला. प्रत्येकाची चौकशी सुरु आहे. या आरोपींच्या फोनची चौकशी सुरु आहे. कोणाकोणाला किती फोन गेले, काय फोनवर संभाषण झालं, हे आता सर्व समोर येतं आहे. या सर्वाचा अतिशय बारकाईने तपास सुरु आहे, असे अजित पवार म्हणाले.

“कडक शिक्षा केली जाईल”

अशाप्रकारच्या घटना महाराष्ट्रात आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. ही निर्घृण हत्या झाली आहे. यात तितक्याच गांभीर्याने सरकारने लक्ष दिले आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातील नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींना काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, ही पण खबरदारी घ्यावी लागते. माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. जे दोषी असतील, त्यांची अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही. त्यांना कडक शिक्षा केली जाईल. यामुळे वेगळ्या प्रकारचा मेसेज दिला जाईल.

“नुसते आरोप करण्यापेक्षा जर तुमच्याकडे पुरावे असतील, ते सीआयडी, एसआयपी यांना द्या. कारण आपल्याला माहितीये पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे त्यांना मी पुरावा द्यायला सांगितलं आहे. याबद्दल माझी आणि चंद्रशेखर बावनकुळे तसेच माझी आणि मुख्यमंत्र्यांचीही चर्चा झाली आहे. तीन चौकशी सुरु आहेत. तिन्ही समिती बारकाईने यावर काम करत आहेत. कारण उद्या रिपोर्ट देत असताना त्यात काही तफावत दिसली तर विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे फार बारकाईने याचा तपास सुरु आहे. तुम्हाला जितकी काळजी आहे, तितकीच आम्हालाही काळजी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. आम्ही सरकारमध्ये असल्याने यात आमची जबाबदारी जास्त आहे. यात राजकारण आणून देणार नाही आणि कोणालाही पाठीशीही घालणार नाही”, असेही अजित पवार म्हणाले.