Devendra Fadnavis : 2030 पर्यंत महाराष्ट्रात 52% उर्जा अपारंपारिक स्त्रोतातून मिळणार – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 07, 2025 | 2:11 PM

Maharashtra Assembly CM Devendra Fadnavis Speech : आपण जी वीज वापरतो ती अपारंपारिक स्त्रोतून आणायची आहे. 2030 सालापर्यंत 52 टक्के ऊर्जा अपारंपारिक स्त्रोतातून करणारं महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत महाराष्ट्रात 52% उर्जा अपारंपारिक स्त्रोतातून मिळणार - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Follow us on

राज्यपालांच्या अभिभाषण ठरावावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उत्तर दिलं. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना तयार केली जात आहे. त्यातून दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होतील, असे त्यांनी नमूद केलं. आपण बळी राजा मोफत वीज योजना जाहीर केली. 45 लाख कृषी धारकांना मोफत वीज देत आहोत. वर्षाला 14 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. अर्थमंत्र्यांनी या योजनेत कोणतीही कपात सूचवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे, असे ते म्हणाले.

एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी. या प्रकल्पात कृषीचे फिडर वेगळे केले आहे. एकूण कृषीला 16 हजार मेगावॅट वीज द्यावी लागते. त्याची कॉस्ट 8 रुपये प्रति युनिट आहे. पण आपण शेतकऱ्यांकडून एक रुपया किंवा सव्वा रुपये युनिट घ्यायचो. सहा रुपये सबसिडी द्यायचो. आता डिस्ट्रीब्यूटर पद्धतीने फिडरचं सोलरायजेशन करण्यात येत आहे. त्यामुळे १६ हजार मेगावॅटचं काम सुरू झालं आहे. 2 हजार मेगावॅटचं काम झालं आहे. 2026 पर्यंत ही योजना मार्गी लागणार आहे. त्यामुळे जी वीज 7 रुपयाला मिळायची ती आता तीन रुपयाला मिळणार आहे. त्यामुळे युनिटमागे पाच रुपये आपण वाचवणार आहोत. त्यामुळे विजेची खरेदी किंमत कमी होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
गती शक्ती पोर्टलचा उपयोग करून आपण सर्व विकासकांना जागा दिल्या. त्यामुळे हे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाही वीज मिळणार आहे. वीज खरेदी खर्चात 10 हजार कोटींची बचत होणार आहे. कार्बन उत्सर्जनात 25 टक्क्याची कपात होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आपण जी वीज वापरतो ती अपारंपारिक स्त्रोतून आणायची आहे. 2030 पर्यंत जे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा महाराष्ट्रात 52 टक्के अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

जलयुक्त शिवार २ योजना अंमलात आणली. नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहे. गोदावरी खोऱ्यातील पाणी हे नळगंगा खोऱ्यात वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सात जिल्ह्यातील 10 लाख एकर जमिनीसाठी फायदा होईल. ३१ नवीन धरणे, ६ धरणांची उंची वाढ, ४२६ किलोमीटरचे कालवे अर्थात नवीन नदी तयार करत आहोत.प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष कामास दोन वर्ष काम सुरु करण्यासाठी लागतील. ६ ते ८ वर्षांच्या काम पूर्ण होईल. संपूर्ण विदर्भ दुष्काळ मुक्त दिसेल, असे काम हाती घेतलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दीड कोटी ग्राहक होणार वीजबील मुक्त

मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण सुरू केली आहे. मागच्या एका वर्षात पावणे तीन लाख सौर कृषी पंप आपण स्थापन केले आहे. प्रती दिवशी आपण एक पंप लावत आहोत. आपण आता हा दर दीड हजारावर नेणार आहे. मागच्या एका वर्षात 14 लाख जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झाली आहे,

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना यातही आपण नंबरवर आहोत. पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेच्या धर्तीवर आपण योजना आणत आहोत. या योजनेत आपल्याकडे एकूण घरगुती ग्राहक आहेत. त्यांच्या ७० टक्के ग्राहक शून्य ते १०० युनिट वीज वापरतात. त्यांच्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या धर्तीवर आपण योजना करत आहोत. त्या योजनेमुळे हे ७० टक्के ग्राहक या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. म्हणजे दीड कोटी ग्राहक विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.