माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर धक्कादायक आरोप केले आहेत. सरकार मतदान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी भाजपला अनुकूल वातावरण आहे, तिथे वेगाने मतदान होत आहे, इतर ठिकाणी मात्र संथगतीने मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आरोपांची माळ लावताच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जशास तसं उत्तर दिलं आहे. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. सरकार मतदान कमी होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही मतदान केंद्रावर जा. रांगेत उभे राहा. तुम्हाला मतदान करण्याची संधी मिळेल. तुम्ही रांगेत असाल आणि वेळ संपली तरी तुम्हाला मतदान करण्याची संधी द्यावी लागेल. लोकांना मतदान करायचं आहे. पण जाणूनबुझून त्यात विलंब केला जात आहे. 5 वाजले तरी रांगेत उभे राहा आणि मतदान करा. प्रक्रियेत उशीर केला जात असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं आहे. सरकार निवडणूक आयोगाच्या नावाने खेळ खेळत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
ज्या ठिकाणी भाजपाला वातावरण अनुकूल आहे. त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया वेगाने होत आहे. मात्र, जिथे लोकांना शिवसेनेला मतदान करायचं आहे, तिथे निवडणूक प्रक्रियेत उशीर केला जात आहे. भाजप जाणूनबुजून असं करत आहे. आम्ही हा डेटा एकत्र करत आहोत. निवडणूक आयोगाच्या या पक्षपातीपणाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.